बारामती : लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून धमक्या दिल्या जात असल्याची चर्चा सुरू असतानाच ‘अशा धमक्यांना घाबरू नका, त्यांना दुरुस्त करण्याची वेळ आता आली आहे’, अशा शब्दांत शरद पवार यांनी सोमवारी कार्यकर्त्यांना धीर दिला. कितीही धमक्या द्या, तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी ही अवलाद आहे, असे थेट आव्हानच शरद पवार यांनी दिले.

शरद पवार यांनी आज बारामतीच्या जिरायत भागाचा दौरा केला. सुपे येथील सभेत ‘घडय़ाळाला मतदान केले नाही तर पाणी मिळणार नाही, कारखान्याला ऊस जाणार नाही’, असा मजकूर असलेली चिठ्ठीच त्यांनी वाचून दाखवली व अजित पवारांवर टीकेची तोफ डागली. ‘जनाई-शिरसाई योजनेच्या कामाची जबाबदारी मी ज्यांच्यावर दिली होती, त्यांनी ती पार पाडली नाही. मी गेली २० वर्षे स्थानिक विषयात लक्ष घालत नव्हतो. परंतु आता लक्ष घालून मी माझी जबाबदारी पार पाडेन’, असे आश्वासन पवार यांनी दिले. जिरायत भागाने नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे या आपल्या माणसांचे प्रश्न सोडवणे ही जबाबदारी असल्याचे पवार म्हणाले. आपण कृषिमंत्री व नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्या राज्याला प्रचंड मदत केली. ते कोणत्या पक्षाचे आहेत यापेक्षाही एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्या राज्यातील शेतकरी सुखी करण्यासाठी मदत केली पाहिजे, हे धोरण नेहमी राबवले, असे शरद पवार यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा >>>जुने वितुष्ट संपवून आशिष शेलार यांचे सलमान खानशी जुळले मैत्रीचे सूर, उत्तर मध्य मतदारसंघ बांधणीस सुरुवात

‘हा गडी थांबणारा नाही’

शरद पवार यांच्या वयावरून विरोधक वेळोवेळी टिप्पणी करीत असतात. यावर मिश्कील टिप्पणी करत पवारांनी विरोधकांना टोले लगावले. ते म्हणाले, की अनेक जण ८४-८५ वय झाले असे म्हणतात. तुम्ही वय काढू नका. तुम्ही अजून काय पाहिले आहे? हा गडी थांबणारा नाही. ज्या लोकांनी साथ दिली, त्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जनहिताची कामे करत राहील..

Story img Loader