येथील रत्नागिरी एज्यु. सोसायटीच्या गंगाधर गोिवद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूलच्या कै. बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्पाच्या प्रस्तावित नवीन इमारतीचा कोनशिला व नामकरण सोहळा लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते आज होणार असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी दिली.
संस्थेच्या खातू नाटय़ मंदिरात आयोजित या कार्यक्रमाला आमदार उदय सामंत हे प्रमुख अतिथी तर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. मुकुंदराव जोशी हे अध्यक्ष हे राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांना एनसीसी परेडची मानवंदना देण्यात येणार आहे. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते
विस्तारित इमारतीच्या जागेचे भूमिपूजन व कोनशिलापूजन होणार आहे. जून २०१४ पासून जीजीपीएसमध्ये गुरुकुल प्रकल्प चालविला जात आहे. वयाच्या ५ ते ६ व्या वर्षांपासून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो व त्यांना पंचक्रोशाधारित शिक्षण प्रणालीचा अवलंब करून शिक्षण दिले जाते. त्यातून विद्यार्थ्यांना श्रम, सुदृढ आरोग्य, त्याग, सेवा, देशभक्ती, संवेदनक्षमता यांचे शिक्षण मिळून एक जबाबदार नागरिक घडवला जातो. यातून विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास शक्य होतो.
सध्याची इमारत वाढीव विद्यार्थ्यांची संख्या व नवनवीन अभ्यासक्रम यामुळे अपुरी पडत असल्याने या प्रकल्पाचा विस्तार करण्यात येत आहे. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते आज सकाळी ११ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अॅड. पाटणे यांनी केले आहे.

Story img Loader