लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी अद्यापही जागा वाटपाचा घोळ सुटलेला नाही. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अजूनही जागा वाटपाचा तिढा आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये अनेक पक्ष सामील असल्याने कोणत्या जागेवरून कोणाला संधी द्यावी, यावर मतमतांतरे दिसून येत आहेत. यामुळे येत्या काळात जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुतीचंही जागावाटप येत्या दोन दिवसांत होईल, असं खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.
“महायुतीच्या जागेसंदर्भात लवकर निर्णय होऊन कोण कुठल्या जागेवरून लढणार हे कळेल. येत्या दोन दिवसांत जागावाटप होणार आहे. परंतु, जागा वाटपाआधीच सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
दरम्यान, महायुतीसाठी शिर्डीची जागा महत्त्वाची आहे. कारण, या जागेवरून रामदास आठवलेंनीही मागणी केली आहे. तर, मनसे महायुतीत आल्यास त्यांनीही या जागेसाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे ही जागा कोणाच्या पारड्यात पडणार हे महत्त्वाचं आहे. यावर श्रीकांत शिंदे म्हणाले, शिर्डी लोकसभेच्या जागेवर विद्यमान खासदार हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे शिर्डीची देखील जागा शिवसेना लढेल.
हेही वाचा >> महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार निवडणूक; कोणत्या जिल्ह्यांत कधी होणार मतदान? जाणून घ्या
महायुतीच्या सरकारने सकारात्मक निर्णय घेतले
“मराठा समाज आणि मनोज जरांगे यांच्या ज्या काही मागण्या होत्या, त्याबाबत सरकार पूर्णपणे सकारात्मक होते आणि त्यानुसारच सरकारने इतक्या वर्षांनंतर मराठा समाजासाठी सकारात्मक निर्णय दिला. मराठा समाजाला ऐकणारं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मिळालं आहे. त्यामुळे महायुतीच्या सरकारने मराठा समाजाबद्दल सकारात्मक निर्णय घेण्याचे काम केले आहे, असंही श्रीकांत शिंदे म्हणाले.
महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान
महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असून, पहिला टप्पा १९ एप्रिल २०२४ रोजी पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर, चंद्रपूर या पाच मतदारसंघांत मतदान होणार आहे. तर २६ एप्रिल २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यात ८ मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार असून, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच तिसरा टप्पा हा ७ मे रोजी होणार असून, यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे चौथा टप्पा १३ मे रोजी पार पडणार असून, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच पाचवा टप्पा २० मे २०२४ रोजी पार पडणार असून, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा एकूण १३ मतदारसंघांत मतदान होणार आहे.