रायगड जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागातील बोगस सहया प्रकरणाचा पोलीस तपास ढिम्म आहे. गुन्हा दाखल होऊन सहा महिने होत आले तरी रायगड पोलीसांनी यात कुठलीही कारवाई केलेली नाही. अशातच शिक्षकांच्या झालेल्या आंतरजिल्हा बदली प्रकरणातील सहयाजीराव कोण हे कोकण विभागीय आयुक्तांच्या अहवालामुळे समोर आलं आहे . याच विभागात लिपीक म्हणून काम करणारा अमोल ठाकूर यानेच या सहया केल्या आहेत असे आयुक्तांचा अहवाल सांगतो आहे. धक्कादायक बाबम्हणजे कोकण आयुक्तांच्या या अहवालाला जिल्हा परीषदेबरोबरच राज्याच्या ग्रामविकास विभागानेही केराची टोपली दाखवली आहे.
जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्यांमध्ये मोठा गरव्यवहार झाला असल्याचे सहा महिन्यांपूर्वीच उघड झाले होते . तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपटटे यांच्या बनावट सहया करून जिल्हयात कार्यरत तब्बल २१ शिक्षकांना जिल्हा बदलीच्या ऑर्डर देण्यात आल्या होत्या सुरूवातीला हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला . मात्र बोभाटा झाल्यानंतर तत्कालीन शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला . या प्रकरणात पोलीस तपासात अद्याप काहीही प्रगती दिसत नाही.
मात्र आता कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील एक अहवाल माहिती अधिकारात समोर आला आहे. त्यानुसार अमोल ठाकूर यानेच १५ शिक्षकांच्या बदली ऑर्डरवर सीईओंच्या बनावट सहया केल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे . अमोल ठाकूर याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असली तरी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही . तसा गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांना देण्यात आले होते . परंतु तसेही घडले नाही . महत्वाचे म्हणजे गुन्हा दाखल होवून ६ महिने झाले तरी पोलीसांना या तपासात काहीच मिळालेले नाही . याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे . महत्वाचे म्हणजे कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी आपला अहवाल राज्याच्या ग्रामविकास विभागाकडे पाठवला असताना या वि भागानेही याची दखल घेतलेली दिसत नाही . प्रकरणात अमोल ठाकूर हा एकटाच होता की त्याला कुणाचा वरदहस्त होता याचा शोध पोलीसांना घ्यावा लागणार आहे. कोकण आयुक्तांनी अहवाल देवूनही अमोल याचे नाव आरोपी म्हणून का नमूद केले नाही ,या प्रकरणात आíथक व्यवहार झाला का , असेल तर किती , अमोल याचा करविता धनी कोण होता याची संपूर्ण सखोल चौकशी व्हावी , अशी मागणी होत आहे .
‘अमोल ठाकूर हा मोहरा असून त्याचे गुरू वेगळेच आहेत . , आयुक्तांनी अहवाल दिल्यानंतरही यात कुठलीच पावलं उचलली जात नसल्याने यात अनेक हात गुंतलेले आहेत असा संशय येतो . यात फार मोठे रॅकेट असून याची संपूर्ण चौकशी व्हायला हवी, या प्रकरणाचा पोलीस तपास योग्य पध्दतीने होत नाही ’ – मधुकर ठाकूर , माजी आमदार