अहिल्यानगर : देशाच्या दक्षिण-उत्तर भागाला जोडणारा, मध्यवर्ती जिल्हा असलेल्या अहिल्यानगरमध्ये विकासाच्या मोठ्या क्षमता आहेत. अलीकडच्या काळात औद्याोगिक विकास महामंडळासाठी विविध ठिकाणी जागा आरक्षित झाल्याने या क्षमतांमध्ये गुंतवणूक करण्याच्या संधी निर्माण झाल्या आहेत. सहकार, साखर कारखानदारी, दुग्धोत्पादनात अग्रगण्य अशी जिल्ह्याची ओळख. पायाभूत सुविधांनी गुंतवणुकीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
अहिल्यानगर जिल्हा नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वांत मोठा जिल्हा अशीही अहिल्यानगरची ओळख आहे. राज्यातील सर्वाधिक उंच कळसूबाईचे शिखर याच जिल्ह्यातील. एकीकडे पाटपाण्याने आलेली सुबत्ता तर दुसरीकडे दुष्काळी पट्टा. या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांनीही शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून उत्पादकता वाढवली आहे.
अलीकडे सेवा क्षेत्राला चालना मिळाली आहे. त्याने पारंपरिक कृषी क्षेत्राला मागे टाकले आहे. कृषी क्षेत्रात ६६ टक्के मनुष्यबळाच्या माध्यमातून जिल्ह्याचे २६ टक्के उत्पन्न मिळते आहे तर सेवा क्षेत्रात १९ टक्के मनुष्यबळातून ४१ टक्क्यांपर्यंत आणि औद्याोगिक क्षेत्रात ११ टक्के मनुष्यबळातून १७ टक्के उत्पन्न मिळते आहे. कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची, प्रक्रिया उद्याोगांची जोड मिळाल्यास अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे. जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात काहीशी वाढ होऊन ते २ लाख ३८ हजार ५८ वर गेले आहे.
गेल्या काही महिन्यात अहिल्यानगर विस्तारित, शिर्डी, बेलवंडी, कर्जत येथे एमआयडीसीला जागा मिळाल्या. शेती महामंडळाची पडीक जमीनही एमआयडीसीसाठी वापरात येऊ लागली आहे. शिर्डीमध्ये संरक्षण उत्पादनास काही उद्याोजकांनी उत्सुकता दाखवली आहे. या बदलामुळे बेरोजगारांच्या स्थलांतराला आळा बसण्यास मदत होणार आहे. उद्याम नोंदणीमध्ये वाढ होत असल्याने सुमारे दोन लाख रोजगार निर्मिती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील दरडोई वीजवापरही दुप्पट झाला आहे. लोकांची क्रयशक्ती वाढल्याचा हा परिणाम. रस्ते बांधणीलाही वेग आला आहे. राष्ट्रीय महामार्गांची काही कामे पूर्ण झाली, काही प्रगतिपथावर असली तरी काही प्रकल्पांचे काम मात्र रखडलेले आहे. जिल्हा क्षेत्रफळाने मोठा असल्याने रस्त्यांची लांबी २२२१६.६१ किमी. आहे, त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग ४६१.६५ कि.मी.चे आहेत. सन २०२२-२३ मध्ये ३६६ कि.मी.चे रस्ते बांधले गेले. तर सन २०२३-२४ मध्ये त्यात वाढ होऊन ६०७ कि.मी. लांबीचे रस्ते तयार झाले. जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत, व्यापारी, खासगी, टपाल अशा ३७ बँकांच्या ७४० शाखा आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २८९ शाखांचे जाळे जिल्हाभर पसरलेले आहे. याशिवाय १७ नागरी बँका, ६९० पतसंस्था जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देत आहेत. निकषानुसार ५ हजार लोकसंख्येपर्यंतची सर्व गावे बँकिंग व्यवस्थेने जोडली गेली आहेत. ग्रामीण क्षेत्र मोठे असल्याने अद्याप डिजिटल बँकिंग व्यवहाराचा हवा तसा प्रसार झालेला नाही. दोन बँका, सुमारे २०० पतसंस्था बंद पडल्याने ठेवीदारांना फटका बसला आहे.
पर्यटनाला मोठी संधी
अहिल्यानगर जिल्ह्यात तीर्थक्षेत्रांची मांदियाळीच आहे. शिर्डी, शनिशिंगणापूर अशी आंतरराष्ट्रीय दर्जाची देवस्थाने आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात भाविक जिल्ह्याकडे आकर्षित होतात. शालेय विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झालेले आहे. ५ हजार २२४ प्राथमिक शाळांपैकी जिल्हा परिषदेच्या ३ हजार ५६८ आहेत. जिल्हा परिषदेने खासगी कंपन्यांच्या सीएसआर निधीतून प्राथमिक शाळांचे आधुनिकीकरण सुरू केले आहे. खासगी माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांची संख्या १ हजार ६२७ आहे. शालेय शिक्षणाच्या सुविधा चांगल्या असल्या तरी उच्च शिक्षणाच्या सुविधांची मात्र कमतरता जाणवते. त्यातून उच्च शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या युवकांची संख्या मोठी आहे.
मुख्य प्रायोजक
सारस्वत को-ऑप बँक लिमिटेड
पॉवर्ड बाय
महानिर्मिती, महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड
नॉलेज पार्टनर
गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅंड इकॉनॉमिक्स, पुणे</p>