रवींद्र जुनारकर, लोकसत्ता
चंद्रपूर : ‘कोलसिटी’अशी ओळख असलेला चंद्रपूर जिल्हा ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पामुळे जागतिक पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. कोळसा, सिमेंट, वीज, स्टील व कागद उद्योगांमुळे जिल्ह्याचे दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पादन दर सर्वाधिक आहे. मात्र औद्योगिकीकरणामुळे प्रदूषणाचे काळे ढगदेखील घोंघावत आहेत.
तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमेवर ११४४३ चौ. कि.मी. क्षेत्रफळात विस्तारलेल्या जिल्ह्याची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या २२ लाख ४ हजार ३०७ आहे. यापैकी ६५ टक्के लोक ग्रामीण भागात तर ३५ टक्के लोकांचे वास्तव्य शहरी भागात आहे. साक्षरतेचे प्रमाण ८० टक्के आहे. जिल्ह्याचे २०२१-२२ चे स्थूल उत्पादन ३१.१५१ कोटी, तर निव्वळ जिल्हा उत्पादन २६.८६५ कोटी असून हे प्रमाण अनुक्रमे राज्याच्या उत्पादनाच्या १.५ टक्के व १.६ टक्के आहे. औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प व मोठया प्रमाणात झालेले औद्योगिकीकरण यामुळे प्रदूषणाची समस्या निर्माण झाली असून लोकांचा श्वास गुदमरू लागला आहे.
हेही वाचा >>> “या दाढीने काडी केली तर…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “माझ्या नादाला लागू नका, अन्यथा…”
सिमेंट उद्योगांचा जिल्हा
या जिल्ह्यातील उद्योगातील गुंतवणूक काही लाख कोटींच्या घरात आहे. वेस्टर्न कोलफिल्डच्या २९ कोळसा खाणींसह बल्लारपूर पेपर मिल, अंबुजा, एसीसी, अल्ट्राटेक, माणिकगड (अल्ट्राटेक), दालमिया असे पाच सिमेंट कारखाने, औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, सेलचा स्टील प्रकल्प, चांदा आयुध निर्माणी, लॉयड मेटल्स, धारीवाल, लोह व पोलाद प्रकल्प, भाताच्या राईस मिल जिल्ह्यात आहे. भद्रावती येथे २० हजार कोटींची गुंतवणूक असलेला कोळशावर आधारित युरिया प्रकल्पाची घोषणा झाली आहे. या जिल्ह्यात १८२ उद्योग सुरू आहेत. तिथे २७ हजार ७१३ कामगारांना रोजगार मिळाला आहे. जिल्ह्यात मोठया प्रमाणात उद्योग असले तरी २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत.
दळणवळणाच्या साधनांची समृद्धी
दिल्ली-चेन्नई या दक्षिण रेल्वेमार्गावर असलेला चंद्रपूर जिल्हा नागपूर, मुंबई, बंगलोर, हैदराबाद तसेच चेन्नई व दिल्ली या प्रमुख शहरांना रेल्वेमार्गाने जोडलेले आहे. मात्र या जिल्ह्यातून मुंबईसाठी एकही रेल्वे गाडी नाही. राष्ट्रीय महामार्गासोबतच राज्य मार्गाने हा जिल्हा राज्यातील सर्व प्रमुख शहराशी जोडला आहे. दळणवळणाचे जाळे जिल्हाभरात विणले गेले आहे. जिल्ह्याला नागपूर-मुंबई समृद्धी मार्गाशी जोडण्यासाठी चंद्रपूपर्यंत स्वतंत्र महामार्ग बांधण्यात येत आहे.
हेही वाचा >>> संजय राऊतांनी जामिनावर बाहेर असल्याचे विसरू नये; मंत्री शंभूराज देसाई यांचा सूचक इशारा
वनोत्पादनापासून ३०.१० कोटींचे उत्पन्न
जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या ४२.३ टक्के भागात वनक्षेत्रात येत असून तेथील वनोत्पादनापासून जिल्ह्याला दरवर्षी ३०.१० कोटींचे उत्पन्न मिळते. सर्वाधिक उत्पन्न तेंदूपत्ता अर्थात विडी पानापासून आहे. उत्कृष्ट सागवान लाकूड, बांबू आणि विपुल वनसंपत्तीचे वैशिष्टय आहे. यामुळे वनात राहणाऱ्या ग्रामस्थांच्या उत्पन्नात वाढ झाली असून त्यांचे जीवनमान सुधारू लागले आहे.
दरडोई वीज वापरात वाढ
औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प असलेल्या या जिल्ह्याचे १०० टक्के विद्युतीकरण झाले असून जिल्ह्यात ५.८ लाख कुटुंबांना जोडण्या देण्यात आल्या आहेत. एकूण १८ लाख ४८ हजार ४०० किलोवॅट्स तास विजेचा वापर करण्यात आला. त्यापैकी घरगुती वापरासाठी २८.८६ टक्के, व्यापारी वापरासाठी व लघुशक्तीसाठी ३.९ टक्के, औद्योगिक वापरासाठी ४५.२ टक्के, सार्वजनिक दिवाबत्तीसाठी १.१ टक्के, कृषी वापरासाठी ११.५ टक्के, तर इतर वापरासाठी ९.५ टक्के वीज वापर झाला.
व्याघ्रप्रकल्पामुळे जगाच्या नकाशावर
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पामुळे हा जिल्हा जगाच्या पर्यटन नकाशावर आला आहे. देशविदेशातून येणाऱ्या पर्यटकांमुळे व त्यांच्यासाठी उपलब्ध पायाभूत सुविधांमुळे पर्यटन व त्याच्याशी जुळलेल्या अन्य उद्योगाला जिल्ह्यात चालना मिळाली आहे. २०० पेक्षा अधिक वाघ एकटया चंद्रपूर जिल्ह्यात असून दरवर्षी तीन लाखांपेक्षा अधिक पर्यटक येथे भेट देतात. वन अकादमी, वनस्पती उद्यान (बॉटनिकल गार्डन) हे पर्यटकांचे नवे आकर्षणाचे केंद्र ठरू लागले आहे.
नैसर्गिक संपत्तीचे वरदान
जिल्ह्याला खनिज संपत्तीचे वरदान आहे. राज्यात तांब्याचे सर्वाधिक साठे जिल्ह्यात आहे. १६०६ मिलियन टन कोळशांसह लोखंड, बॅराईर्टसचे साठे आहेत. क्रोमाईटस, चुनखडक, डोलोमाईट, फ्लोराईडचे साठे आहेत.