अभिमन्यू लोंढे, लोकसत्ता
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सहकारी तसेच राष्ट्रीयीकृत बँका व पतसंस्थाचे चांगले जाळे निर्माण झाले आहे. या बँकांकडून होत असलेल्या पतपुरवठ्यामुळे जिल्ह्यातील पर्यटनासह अन्य पूरक व्यवसायांना चांगली चालना मिळत आहे. याशिवाय आरोग्य क्षेत्रातही जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे. ‘पंतप्रधान मातृ वंदना योजने’ची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. यात १९७५ लाभार्थींची नोंदणी असून तिचे प्रमाण ७५ टक्क्यांच्या आसपास आहे. आरोग्य संरक्षणाच्या क्षेत्रात ३९ टक्के काम झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा >>> अजित पवारांच्या सभेत रिकाम्या खुर्च्या पाहून रोहित पवारांचा चिमटा, Moye Moye गाण्यासह VIDEO शेअर
महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. एका बाजूला अथांग समुद्र तर दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या रांगा आहेत. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला तालुक्यांच्या सीमेलगत गोवा, तर दोडामार्ग-सावंतवाडीच्या सीमेलगत कर्नाटक आहे. त्यामुळे चारही बाजूंनी जिल्ह्यात दळणवळण सुविधा आहेत. कोकण रेल्वे, मुंबई गोवा महामार्ग, सागरी महामार्ग, बॅरिस्टर नाथ पै चिपी विमानतळ, सावंतवाडीशेजारी गोवा राज्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा-आंबोली-कर्नाटक आंतरराज्य मार्ग आणि कणकवली-फोंडाघाट-करूळ घाट हा कोल्हापूर-पुण्याला जोडणारा मार्ग जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. संकेश्वर-आजरा-आंबोली-बांदा हा राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित आहे.
हेही वाचा >>> अशोक चव्हाणांना राज्यसभा दिली तर तुम्हीही जवानांचा अपमान कराल, उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांवर टीका
जिल्ह्यात पर्यटन, भातशेती, आंबा, काजू लागवड आणि मच्छीमारी ही उत्पन्नाची प्रमुख साधने आहेत. फळे व शेती, तसेच मच्छीमारीतील उत्पन्न निसर्गाच्या लहरीवर अवलंबून आहे. जिल्ह्यात नऊ प्रकारची खनिजे, निसर्गसौंदर्य पर्यटन आणि फळझाड लागवडीला वातावरण पोषक आहे. मात्र स्थानिक तरुण नोकरीनिमित्त मुंबई, पुणे, गोवा अशा बाहेरच्या प्रदेशात असतात. पर्यटनासाठी पायाभूत सुविधांची वानवा असली तरी मोठ्या प्रमाणात सागरी पर्यटक येतात. मालवण, देवबाग, तारकर्ली, वेंगुर्ले, शिरोडा – वेळागर, देवगड, विजयदुर्ग येथे सुट्टीच्या दिवसांत पर्यटकांची चांगली गर्दी असते.
सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे स्वतंत्र मंडळ कार्यालय स्थापन केले आहे. त्यामुळे आता संबंधित कामांसाठी रत्नागिरीला जावे लागत नाही. सिंधुदुर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी ते उपयुक्त आहे. बांधकाम खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या विकासाच्या कामासाठी आता वेग येणार असून निधीही जास्त मिळेल अशी अपेक्षा आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी रोजगार निर्मिती हा महत्त्वाचा विषय तरुणांसमोर आहे. आडाळी येथे एमआयडीसीमध्ये उद्याोग होऊ घातले असून सूक्ष्म लघुउद्याोग अंतर्गत उद्याोगांना मान्यता देण्यात आली आहे, मात्र तरुणांची रोजगाराची अपेक्षा एवढ्यावरच पूर्ण होऊ शकत नसल्याचे चित्र आहे.