छत्रपती संभाजीनगर : धाराशिव तसा गरीब जिल्हा. म्हणून केंद्र सरकारच्या लेखी आकांक्षित. गेल्या काही वर्षांतील कामांमुळे मानव विकास निर्देशांकामध्ये पुढे जाणारा. अपारंपरिक ऊर्जा स्रोतातून वीजनिर्मितीमध्ये पुढे जाऊ पाहणारे विकासाचे प्रारूप हळूहळू सुधारते आहे. पण उद्योगधंद्यात झालेली घसरण, दरडोई उत्पन्नात झालेली घट ही मागासपणाची लक्षणे कायम आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्याच्या विकासात फक्त ०.९६ टक्के एवढाच सहभाग. तसे मोठे उद्याोग नाहीत. पण आता टेक्स्टाइल पार्कचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत अग्रक्रम मिळवताना बालमृत्युदर कमी करण्यात आणि आरोग्य केंद्रातील प्रसूतीमध्ये लक्षणीय वाढ करण्यात धाराशिव जिल्ह्यातील प्रशासनाला यश मिळत असल्याचे चित्र आहे. खरे तर हवा, पाणी आणि तुळजाभवानी एवढेच काय ते बरे असे सांगितले जायचे; पण आता धार्मिक पर्यटनाला चालना मिळत आहे. एकाच वेळी पाच पिलांना जन्म देणाऱ्या उस्मानाबादी शेळीवरही संशोधन सुरू आहे. त्यामुळे विकासवेग वाढेल, असा दावा केला जात आहे.

महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न दोन लाख ४८ हजार ६३२, तर धाराशिवचे ते एक लाख ५३ हजार ९६२ एवढेच. १६ टक्के अनुसूचित जातीचे आणि १.८ टक्के अनुसूचित जमातीची लोकसंख्या. साखर, कच्ची साखर, कापूस, द्राक्ष, स्पिरिट अशा मोजक्याच पदार्थांची निर्यात. मलेशिया, इराक, बांगलादेश, इंडोनेशिया, अफगाणिस्तान या देशांशी व्यवहार आहेत, पण त्याला हवी तशी गती नाही. भूम तालुक्यातील सरमकुंडी येथील खवा आणि पेढ्याची मोठी बाजारपेठही आहे. आता सौर ऊर्जेवर खवा तयार करणारी यंत्रणाही उभारण्यात आली आहे.

हेही वाचा >>> विकास रुळावर कधी येणार?

आता वस्त्रोद्याोग क्षेत्रातील गुंतवणूक या जिल्ह्यात व्हावी असे प्रयत्न सुरू झाले आहेत. दरडोई उत्पन्न वाढवताना आरोग्य आणि शिक्षणाच्या सोयीही वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे. अलीकडेच वैद्याकीय महाविद्यालय झाले आहे. त्यामुळे आरोग्याच्या सुविधा वाढल्या आहेत.

आजही धाराशिवचा माणूस शिकण्यासाठी लातूरला आणि कपडे घ्यायला सोलापूरला जातो. त्यामुळे आकांक्षित म्हणजे गरीब जिल्हा ही नोंद पुसण्यास आणखी काही वर्षे लागतील, असे सांगण्यात येते. सन २०२८ पर्यंत विकासाचा वेग पकडेल असे नियोजन केले जात आहे. पण आजही पंतप्रधान आवास योजनेला वेग पकडता आला नाही तो नाहीच!

अन्नप्रक्रिया उद्योगांचे नियोजन

नोंदलेल्या चारशेहून अधिक शेतकरी गट, तसेच १५ हजार महिला बचत गटांतील सदस्यांना कृषी व अन्नप्रक्रिया उद्याोगाशी जोडण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. भूम व कळंब या दोन तालुक्यांतून सध्या २० हजार किलो खवा रोज तयार होतो. त्यामुळे या व्यवसायाला चालना देणारी यंत्रणाही उभी राहू शकते.

काय होऊ शकेल ?

सोयाबीन आणि डाळीच्या उत्पादनामध्ये २० टक्के वाढ करता येणे शक्य होईल असे सांगण्यात येत आहे. पण उत्पादकता वाढवायची असेल, तर सूक्ष्म सिंचनाची व्याप्ती १८ वरून २५ टक्क्यांवर न्यावी लागणार आहे. पीक पद्धतीमध्येही बदल करावे लागणार असून, कृषी आधारित लघुउद्याोग उभे करावे लागणार आहेत. टोमॅटो, मिरची, कांदा आणि कोथिंबीर या भाज्यांचे क्लस्टरही सुरू केले जाणार आहेत. पण हे सारे घडवून आणण्यासाठी पाण्याची उपलब्धता आवश्यक असणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta district rating article about dharashiv district development issues zws