पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील तसेच मुंबईमधील करोनासंदर्भातील कामाचं कौतुक केल्याचा पुरावा काय आहे असा प्रश्न राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील करोनासंदर्भातील कामाचं कौतुक केल्याची एखादी व्हिडीओ क्लिप वगैरे आहे का? असा प्रश्न फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवादमालेत बोलताना उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये मृतांचा आकडा लपवला जात असल्याचं एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. त्यावरुनच लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी एवढी लपवाछपवी असेल तर पंतप्रधान का कौतुक करतात?, असा प्रश्न फडणवीस यांना विचारला. “पंतप्रधानांनी केलेलं कौतुक तुम्ही ऐकलं का?, कोणी तरी ऐकलं का?”, असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी उपस्थित करत हा सर्व प्रचार करण्याचा भाग असल्याची टीका केली. “मला एक तरी क्लिप दाखवा, हीच मजेची गोष्ट आहे की इकोसिस्टीम अशी तयार झालीय की रोज सकाळी एक खोटी, दिशाभूल करणारी बातमी सोडायची. त्यानंतर इकोसिस्टीमने ती वाजवायची. माझा सवाल आहे की पंतप्रधानांनी कौतुक केल्याचं कोणीतरी ऐकलंय का? कोणीच ऐकलं नाही,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> मनसे भाजपा युती होणार का?; फडणवीस म्हणाले, “मनसेने हिंदुत्व…”

“दुसरी गोष्ट अशी की बोलताना पंतप्रधान म्हणून शकतात की हा मुद्दा तुमचा चांगला आहे. याचा अर्थ तुम्ही जे केलेलं चुकीचं आहे ते सगळं बाजूला गेलं. जो मुद्दा चांगला त्यामुळे तुमच्याकडील सर्व म्हणजे मलेले लोकं, सर्वाधिक मृत्यू हे सगळं बाजूला सारणार. करोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात २३ टक्के मृत्यू आहेत. अजूनही काही नोंदी होणं बाकी आहे. ५० टक्के नोंदी अजून अनेक ठिकाणच्या बाकी आहेत. महाराष्ट्राचं चांगलं होतं असेल तर आनंदच आहे. मात्र महाराष्ट्रात सर्वात जास्त लोक मरत असताना, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असताना, महाराष्ट्रात सर्वाधिक अव्यवस्था झालेली असताना केंद्र मदत करत नाही सांगायचं. मी आकडेवारीसहीत सांगितलं केंद्राने महाराष्ट्राला मदत कशी केली आणि सर्वात जास्त कशी केली. एकीकडे मदत न मिळाल्याचा आरोप करायचा आणि दुसरीकडे कौतुक होत असल्याच्या ववड्या उठवायच्या. क्रेडीट घेता तर देशातील सर्वात जास्त मृत्यूचं डिसक्रेडीटही तुम्हाला घ्यावं लागेल,” अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी राज्य सरकारच्या करोना कारभारावर निशाणा साधला.

यावर प्रतिप्रश्न करताना गिरीश कुबेर यांनी मग आम्ही कौतुक केलं नाही असं भाजपाच्या बाजूने का स्पष्ट करण्यात आलं नाही. निती आयोगाचे व्हि. के. पॉल यांनीही कौतुक केलं. मग यामध्ये अनेक कच्चे दुवे का दिसत आहेत असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना भाजपाने का खुलासा करावा असं फडणवीस यांनी विचारलं. पुढे बोलताना फडणवीस यांनी निती आयोगाने निती आयोगाने ऑक्सिजन बँकेचं कौतुक केलं. याचा अर्थ ते मुंबई मॉडेलचं कौतुक केलं असं म्हणता येणार नाही. पुणे महानगरपालिकेचं सर्वाधिक कौतुक निती आयोगाने केलं. पण ती का दाखवली नाही? कारण तिकडे भाजपाची सत्ता आहे आणि इथे शिवसेनेची आहे. मी ऑन रेकॉर्ड सांगतो की मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी चांगलं काम केलं. त्याचं कौतुक आहेच पण जे चुकलं आहे त्याचीही जबाबदारी घ्यावी लागेल. कमी पडल्याची जबाबदारी घ्यावी लागेल. निती आयोगाने एका उपक्रमाचं कौतुक केल्यानंतर त्यांनी जणू काही तुम्हाला मुंबई मॉडेल हे देशातील बेस्ट मॉडेल असल्याचं प्रमाणपत्र दिलं असं दाखवलं. बेस्ट मॉडेल होतं तर मृत्यू लपवण्याचं कारण काय होतं?, असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.

नक्की वाचा >> आमदार फडणवीस, मुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री पद गेलेले फडणवीस वेगवेगळे का वाटू लागलेत?

सर्वात जास्त पैसा राज्य सरकारने मुंबईला दिला. एक तरी कोव्हिड सेंटर नागपूर, औरंगाबाद, नाशिकला काढलं का तुम्ही? नाही काढलं. तुम्ही ते तिथल्या महानगरपालिकेंच्या भरोश्यावर सोडून दिलं. कारण तुम्हाला हे माहितीय की मुंबई रिपोर्ट होते. मुंबई ऑबसेशन आहे. बाकी रिपोर्ट होत नाही. कितीही नागपूरात मेले तरी रिपोर्ट होत नाही. हे मॉडेल वगैरे सांगितलं जात आहे त्यासंदर्भात इकोसिस्टीम काम करतं. जणू खूपच मोठं काही झालं असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. ही जी पीआरची पद्धत आहे त्याला माझा विरोध आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

Story img Loader