आम्ही राजकारणात भजन स्पर्धेसाठी आमचा पक्ष चालवत नाही असं राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आमचा एक विकासाचा अजेंडा असून तो तो अजेंडा राबवायचा असेल तर सरकारमध्ये यावं लागेल असं त्यांनी सांगितलं आहे. ‘लोकसत्ता’कडून आयोजित ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूर-संवादमालिकेत ते बोलत होते.
सरकार पडणं भाजपाच्या अजेंडाचं बायप्रॉडक्ट; देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
सरकार पडणं हा तुमच्या प्रतिक्षेचा भाग असायला हवा का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “आम्ही राजकारणात भजन स्पर्धेसाठी आमचा पक्ष चालवत नाही. केवळं भजनं म्हणण्यासाठी आम्ही येथे आलेलो नाही. आमचा एक विकासाचा अजेंडा आहे. तो अजेंडा राबवायचा असेल तर सरकारमध्ये यावं लागेलं. आम्हाला काय खुर्च्या उबवण्यासाठी सरकारमध्ये यायचं नाही”.
“सत्ता पक्षात असो किंवा विरोधी पक्षात आमचा अजेंडा ठरलेला आहे. आमच्या अजेंड्यावर आम्ही करत आहोत. आमच्या अजेंड्यावर काम करताना सरकार पडणं आमचं बायप्रॉडक्ट आहे, मेन प्रॉडक्ट नाही,” असंही यावेळी ते म्हणाले.
हे सरकार आपल्या वजनाने निश्चित पडेल
अंतर्गत विरोधाभास दिसत असताना त्याला पाडणं हाच भाजपाचा कार्यक्रम असल्याची प्रतिमा का निर्माण होत आहे? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “अशी प्रतिमा काही निर्माण होत नाही. पण माध्यमांनाही बातमी मिळते की हे पाडण्याचा, जगवण्याचा प्रयत्न करतात. या पक्षात मी माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आहे. आमच्या अजेंड्यावर कोविड असून सरकार पाडणं नाही”.
पुढे ते म्हणाले की, “मी म्हणालो होतो त्याप्रमाणे घडत आहे. आपल्या अंतर्गत विरोधाने हे सरकार पडेल सांगितलं तेव्हा लोकांना खरं वाटत नव्हतं. पण आता लोकांना जाणवू लागलं आहे. धोरणात्मकतेचा अभाव लोकांना जाणवत आहे. मी गंमतीने तीन पायांची रिक्षा असून तीन पाय वेगवेगळ्या दिशेने जात असल्याचं म्हणायचो, पण आज हे जाणवत आहे. मला वाटतं आमच्याकडे खूप संयम आहे. आम्ही विरोधी पक्षाचं काम अचूक करत आहोत. जनतेची गाऱ्हाणी मांडत आहोत. आणि आम्हाला विश्वास आहे की, आम्हाला काही करायची गरज नाही, हे सरकार आपल्या वजनाने निश्चित पडेल”. फडणवीसांनी यावेळी मीडियावरही निशाणा साधला. “मीडियाबद्दल रोख नाही पण हे सरकार चाललं पाहिजे अशी जबाबदारी घेतल्याचं दिसत आहे. त्यामुळे जेवढी छाननी आमची व्हायची त्याच्या पाच पटही यांची होत नाही,” असं ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “मी पाच वर्ष मुख्यमंत्री होतो तेव्हा पहिलं वर्ष वगळता चारही वर्ष आम्ही गुजरातच्या पुढे गेलो. गुंतवणुकीत आम्ही गुजरातला इतकं मागे टाकलं की गुजरातसहित तीन प्रमुख राज्यांची जितकी गुंतवणूक व्हायची त्यापेक्षा जास्त आम्ही महाराष्ट्रात आणत होते. आता जे सरकार आलं आहे या सरकारमध्ये गुजरात १० टक्के पुढे गेलं पण कोणी काहीच बोलत नाही. आमच्या काळात किती आंकांडतांडव करायचे सर्वजण. पण आता कोणी त्याच्यावर प्रश्न विचारण्यास तयार नाही”.
गुजरातच्या पुढे महाराष्ट्राला नेलं म्हणून पुन्हा मुख्यमंत्री होऊ नये यासाठी दिल्लीने प्रयत्न केले असं तर नाही ना? असा मिश्किल प्रश्न विचारल्यानंतर फडणवीसांनी, “गुजराच्या पुढे महाराष्ट्राला नेल्याने येथील तीन पक्षांना हा पुन्हा मुख्यमंत्री झाला तर आपल्याकडे मुद्दा उरणार नाही असं वाटलं म्हणून एकत्र आले,” असा टोला ठाकरे सरकारला लगावला.
लॉकडाउनच्या गोंधळावर भाष्य –
“आत्ताचं जे महाविकास आघाडी सरकार आहे त्यात एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री आहेत. अनेक लोक मुख्यमंत्र्यांच्या आधीच निर्णय जाहीर करतात. मीदेखील पाच वर्ष मुख्यमंत्री होतो. त्याचे काही संकेत असतात. महत्वाचे धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचे असतात आणि मुख्यमंत्री एखाद्या मंत्र्याला नेमतात त्यांनी ते जाहीर करायचं असतं. कारण त्याचे परिणामही तसे अपेक्षित असतात. या सरकारमध्ये कितीही महत्वाचे निर्णय असो ज्याच्या मनात येईल तो निर्णय जाहीर करतो,” अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली.
“कॅबिनेटमध्ये धोरणात्मक निर्णयांची चर्चा होते. ती चर्चा प्रत्येकजण ऐकतो. चर्चा ऐकल्यानंतर हा निर्णय मला कसा लोकांपर्यंत पोहोचवता येईल आणि त्याचं श्रेय घेता येईल हे सर्व होताना दिसत आहे. त्यातूनच कालचा प्रकार घडला आहे. यामुळे लोकांचा फार भ्रमनिरास होते. लोक आता चातकासारखे डोळे लावून आहेत. सुरु आहे सांगायचं आणि नंतर बंद आहे असं स्पष्टीकरण देणं लोकांना त्रास देणारं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांवर चाप ठेवला पाहिजे. मंत्र्यांनीही रोज बाहेर येऊन मुख्यमंत्री काय निर्णय जाहीर करणार आहेत सांगायचं आणि उद्या मुख्यमंत्री जाहीर करणार सांगायचं…मग तुम्ही कशा पाहिजे. हे बंद झालं पाहिजे,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.