मी एक सक्षम विरोधी पक्षनेता असून माझी जबाबदारी पार पाडताना मी सरकारला प्रश्न विचारणारच, प्रसारमाध्यमं विचारत नसतील तरी मी प्रश्न विचारणार, अशी भूमिका राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवादमालेत आज देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता म्हणून आपण पायाला भिंगरी लागल्यासारखं फिरत असल्याचं सांगताना लोकांमध्ये जाऊन आपण अधिकाऱ्यांच्या पलिकडची माहिती गोळा करुन सरकारला देत असल्याचं सांगितलं. तसेच त्यांनी आमदार फडणवीस, मुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री पद गेल्यानंतरचे फडणवीस यामधील फरक का झालाय हे सुद्धा सांगितलं.
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुलाखतीदरम्यान फडणवीसांना, तुम्ही सध्या सत्तेत असणाऱ्या सरकारला हनिमून पिरेड दिलाच नाही किंवा बासं झालं हे सराकर पाडायला हवं, अशी भूमिका का घेतली असा प्रश्न विचारला. तसेच आमदार म्हणून देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री पदाकडे जोमाने निघालेले फडणवीस किंवा मुख्यमंत्री पदावर चांगली मांड ठोकलेले देवेंद्र फडणवीस आणि पदाकडे निघालेले देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री पद गेलेले देवेंद्र फडणवीस हे तीन वेगवेगळे वेगळे का वाटायला लागलेत?, असा प्रश्न मला पडतो असंही गिरीश कुबेर म्हणाले.
नक्की वाचा >> मनसे भाजपा युती होणार का?; फडणवीस म्हणाले, “मनसेने हिंदुत्व…”
आमदार, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता म्हणून आपण १०० टक्के भूमिका बजावत असल्याचं यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले. “देवेंद्र फडणवीसमध्ये तुम्हाला एक बाब निश्चितपणे पहायला मिळेल की जी परिस्थिती असेल किंवा जी भूमिका असेल त्याला १०० टक्के द्यायचं. आमदार देवेंद्र फडणवीस १०० टक्के आमदार होता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १०० टक्के मुख्यमंत्री होता. विरोधी पक्ष नेता असणारा देवेंद्र फडणवीस सरकारशी समझोता करणार नाही. रचनात्कम नक्की राहू. कोव्हिडच्या काळामध्ये माझं एकही स्टेटमेंट तुम्हाला सरकारच्या विरोधात दिसणार नाही पण मी व्यवस्थेच्याविरोधात बोललो, चुकलो असेल तर बोललो. पण केवळ विरोधाकरता विरोध कधीच केला नाही. मी एक सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून सरकारला उघडं पाडणार नाही का?,” असं फडणवीस म्हणाले.
“मुंबईमध्ये ४० टक्के मृत्यू हे इतर कारणांमुळे असल्याचं दाखवलं जात आहे. ज्या देशात ०.७ टक्के आणि महाराष्ट्रात ०.८ टक्के आहेत. पण मुंबईत ४० टक्के असे मृत्यू दाखवले जात असतील आणि माध्यमं प्रश्न विचारणार नसतील तरी मी विचारणार आहे. एकट्या मे महिन्यात २६ हजार मृत्यू झाले. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीआर केला गेला, मुंबई पॅटर्न सांगितला जतोय, आकडेवारी दिली जातेय. जुन्या पिकच्या दोन महिन्यातही २६ हजार मृत्यू झाले नव्हते. एका महिन्यात महाराष्ट्रात २६ हजार लोक गेलेले आहेत. मुंबईतील ४० टक्के मृत्यू धडधडीतपणे लपवले जात आहेत. आता याच्यावर मी बोललो तर मी सत्तेकडे जाण्याचा काय प्रश्न आहे?,” असा प्रतिप्रश्न फडणवीसांनी उपस्थित केला.
“मला कोणी सत्तेकडे जातोय असं म्हटलं तरी मला चिंता नाही. मी जनतेला उत्तरदायी आहे. मी एक सक्षम विरोधी पक्ष नेता आहे. मी पायाला भिंगरी लागल्यासारखा निघालोय. मी जनमानसात जातोय, शेतकऱ्यांमध्ये जातोय, करोना पिडित आहेत त्यांच्यापर्यंत जातोय. सरकारमध्ये काम करताना सरकारचे कान हे अधिकारी असतात. पण विरोधी पक्षाचं काम असतं की अधिकाऱ्यांच्या पलिकडे जाऊन सगळी माहिती गोळा करणं आणि ती सरकारपर्यंत पोहचवणं, ती माहिती पोहचवण्याचं काम मी करत असतो, असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं.