महाराष्ट्रात २०१९ साली राजकीय भूकंप झाला आणि २५ वर्षांहून अधिक काळ युतीमध्ये असलेले शिवसेना आणि भाजपा हे दोन पक्ष वेगळे झाले. या दोन्ही पक्षांना हिंदुत्वाची एक विचारसरणी असूनही या विचारसरणीपेक्षा वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षांशी त्यांनी हातमिळवणी केली. निवडणूक निकालांनंतर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांशी हातमिळवणी करून शपथ घेतली. मात्र, त्यांचं ८० तासांचं सरकार पडल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकासआघाडीचा नवा प्रयोग राज्यात सुरू केला. हे सरकार सत्तेत आल्यापासून वेगळ्या विचारसरणीचा मुद्दा चर्चेत आहे. यावर ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला दृष्टीकोन मांडला आहे.
१९८७ ची पार्ल्याची पोटनिवडणूक!
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी १९८७ साली झालेल्या पार्ले येथील पोटनिवडणुकीची आठवण सांगितली. शिवसेना आणि भाजपा यांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीची सुरुवात खऱ्या अर्थाने १९८७ सालापासून झाल्याचं ते म्हणाले. “याची सुरुवात १९८७ साली झाली. कदाचित भारतातली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली गेलेली आणि जिंकलेली पहिली निवडणूक होती पार्ल्याची पोटनिवडणूक. शिवसेनेनं ती लढली आणि जिंकली होती. शिवसेनाप्रमुख हे या मुद्द्यावर निवडणूक जिंकणारे देशातील पहिले नेते ठरले. त्यानंतर हिंदुत्व या मुद्द्याच्या प्रचाराच्या गुन्ह्याची किंमत त्यांना भोगावी लागली. त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला गेला होता. त्यानंतर ८९ च्या आसपास रथयात्रा वगैरे सुरू झाली. हिंदू नागरिक हिंदू म्हणून मतदान करू शकतात, हे ८७ सालच्या पोटनिवडणुकीत बाळासाहेबांनी देशाला दाखवून दिलं. आम्ही दोन्ही पक्ष तोपर्यत राजकीय अस्पृश्य होतो”, असं उद्ध ठाकरे यावेळी म्हणाले.
आम्ही वेगळे का झालो?
दरम्यान, भाजपासोबत युती तुटल्याचा संदर्भ उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. “आमचा युतीचा मोठा कालखंड विरोधी पक्ष म्हणून गेला आहे. आम्ही राजकीय अस्पृश्य होतो. वाईट काळात एकत्र आलो होतो. पण वाईट काळ गेल्यानंतर वेगळे का झालो? हे का घडलं हा प्रश्न जनतेलाही पडला असेल. एका विचाराच्या पायावर झालेली युती तुटली का? हा प्रश्न आधी येतो. पण आमची आज युती नसली, तरी हिंदुत्वाचे विचार सगळ्यांना पटले आहेत. बाळासाहेबांनी हिंदुत्व शेंडी-जाणव्याचं हिंदुत्व नाही असं म्हटलं होतं. त्यांचं हिंदुत्व राष्ट्रीयत्वाशी संबंधित होतं”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
“…तोपर्यंत ही महाविकासआघाडी टिकणार!” मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास!
दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या महाविकासआघाडी सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. “आपण कुणीही भविष्यवेत्ते नाही. पण काम करण्याची जिद्द असेल, तर पुढच्या कित्येक वर्षांसाठी काम होईल तशी आघाडी टिकवू शकतो. जशी युती टिकली, तशी आघाडीही टिकेल. जोपर्यंत आमच्या तिघांच्या मनातला हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक असेल, तोपर्यंत आघाडी टिकायला काय हरकत आहे? आमच्यात कुरबुरी असत्या, तर सरकार वर्ष-दीड वर्ष चाललंच नसतं. सरकार सुरू झालं, तेव्हा सरकार म्हणून सर्वात नवखा मुख्यमंत्रीच होता. या सर्व लोकांचं मला सहकार्य लाभतंय”, असं ते म्हणाले.