महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेबिनारमध्ये महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावर महत्त्वपूर्ण भाष्य केलं. विकासाचे प्रश्न आणि राजकारण या मुद्द्यावरही राज ठाकरे यांनी भूमिका मांडली. यावेळी लोकांच्या विकासाच्या राजकारणाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. “मी लोकांना सांगत आलोय की, तुम्हाला फक्त राजकारणच करायचं असेल, तर हा विकास हवाच कशाला,” असा सवाल करत त्यांनी अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये केलेल्या कामांचाही हवाला दिला.
विकासाचे प्रश्न आणि राजकारणाचा संबंध नाही, असं वाटतं का? या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, “मला पण हाच प्रश्न पडला आहे. कारण नाशिक शहरासंदर्भात मी एक स्वप्न बघितलं. नाशिकमध्ये फक्त डागडुजी केली नाही. तर कायमस्वरूपी काम केली. पाण्याचा प्रश्न सोडवला. नाशिक खड्डेमुक्त केलं. त्या काळात झालेल्या गोष्टी लोकांनाही अपेक्षित नव्हत्या. अनेक उद्योगपतींना नाशिकमध्ये बोलावलं. त्या शहरात विकासकामं केली. पण ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यात विकासाचा संबंधच नव्हता. म्हणून मी लोकांना सांगत आलोय की, तुम्हाला फक्त राजकारणच करायचं असेल, तर हा विकास हवा कशाला. समाज सुशिक्षित असून, चालत नाही, तो सुज्ञही असावा लागतो, तर त्याला अर्थ आहे. बाळासाहेब व्यंगचित्रकाराबद्दल नेहमी एक वाक्य सांगायचे की, व्यंगचित्रकार हा व्यंगचित्रकार का असतो, कारण तो नेहमी दोन ओळींच्या मधलं वाचतो. सुशिक्षित सुज्ञ समाजाला वर्तमानपत्रांच्या किंवा चॅनेलवरील बातमीच्या दोन ओळींमधील वाचता आलं पाहिजे,” असं म्हणत राज ठाकरे यांनी लोकांच्या विकासाच्या राजकारणाबद्दलच्या उदासिनतेवर खंत व्यक्त केली.
भाजपाचे अतुल भातखळकर माझ्याकडे तिकीट मागायला आले होते; राज यांचा गौप्यस्फोट
“सध्या करोनाच्या लाटेवर सगळे स्वार आहेत. ही लाट जिंकून देणारी नाही. पण, आपल्याला यातून मार्ग काढावा लागेल. तरच आपण जिंकू. पण, कित्येकदा असा प्रश्न पडतोच… विरोधात असले तरी ज्या गोष्टी चांगल्या आहेत. त्या चांगल्या आहेत हे बोलावंच लागतं. अजित पवारांनी बद्दल… अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये खूप मोठं काम केलं. काय आलं नशिबी… पराभव! नाशिकच्या बाबतीत मी एक स्वप्न बघितलं. लोकांनी जर साथ दिली, तर काम करायचा हुरूप येतो ना. त्या पाच वर्षात नाशिक महापालिका ही एकमेव महापालिका होती की, त्या काळात विरोधकांना एकही भ्रष्टाचाराचा आरोप करता आला नाही. हे चांगलं आहे की वाईट? त्यामुळे मी नाशिकच्या शेवटच्या भाषणात म्हणालो होतो की, इतर पक्षांप्रमाणेच राज ठाकरे वागणारं. कामाची अपेक्षा धरायची आणि निवडणुकीत वेगळ्याचं मुद्द्यांवर मतदान करायचं, असं करून चालणार नाही. मग माणसं असा विचार करायला लागतात की यांना विकास नकोय,” असं म्हणत राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.