Girish Kuber Loksatta Drushtikon Video : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव ठकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली आहे. राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत यासंदर्भात विधान केल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही त्यावर प्रतिक्रिया दिली. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चेला आणखी हवा मिळाली. मात्र, सध्याची राजकीय स्थिती पाहता ठाकरे बंधू एकत्र येणं तितकं सोपं आहे का? त्यांच्यापुढे नेमकी आव्हान काय असतील? याविषयी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मांडलेला हा दृष्टिकोन.

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर नक्की काय म्हणाले?

“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांवर ही वेळ का आली? असा प्रश्न निर्माण होतो. एका शब्दांत सांगायचं झालं तर हे दोन्ही भाजपाबाधित पक्ष आहेत. हे एकाच तरुणीवर दोघांनी प्रेम करावं आणि त्या तरुणीने दोघांनाही चुना लावावा अशा पद्धतीचं या दोघांच्या बाबतीत वास्तव दिसतंय. ही तरुणी सत्तेच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारा भाजपा आहे. म्हणजे उद्धव ठाकरे वर्षानुवर्षे भाजपाच्या सहवासात होते. त्यांच्या खांद्यावरून भाजपा महाराष्ट्रामध्ये रुजला. आणि नंतर शिवसेनेचं जे झालं ते झालं. तर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा वेगळ्या अर्थाने मैदानात उडी घेतली, ते भाजपाच्या जवळ जाऊ लागले. मराठी हिंदू हृदयसम्राट अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला. भाजपाचा ब संघ म्हणून काही जणांनी हेटाळणी केली. थोडक्यात तेही भाजपाच्या जवळ गेले. पण आताच्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाल्या नाहीत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं पानिपत झालं, पण त्याही पेक्षा अवस्था राज ठाकरेंच्या मनसेची झाली. त्या पार्श्वभूमीवर दोघांकडून ही चर्चा सुरू झाली आहे”, असं लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर म्हणाले.

“कॉर्पोरेट क्षेत्राचा दाखला द्यायचा झाला तर दोन भाऊ उद्योगसाम्राज्यासाठी झटत असतील तर अंतिमतः नफ्या तोट्याच्या आकडेवारीवरूनच निश्चित होतं. एकाचा वाटा ४९ टक्के आणि दुसऱ्याचा ५१ टक्के अशी अवस्था येते, तेव्हा हातमिळवणी शक्य होते. ती अवस्था आलीय का असा प्रश्न पडतो. त्याचं उत्तर होकार असं द्यावं लागेल”, असंही ते म्हणाले.

“हा‍तमिळवणीच्या प्रक्रियेत मनसे ४९ टक्के आहे. कारण त्यांचे शून्य आमदार आहेत. त्याचवेळेला अत्यंत हलाखीची परिस्थिती असून का असेना शिवसेना बऱ्या अवस्थेत आहे. भाजपाने त्यांचा पक्ष उभा कापला. पण अर्थातच मनसेपेक्षा शिवसेनेची अवस्था बरी आहे. त्यातच हिंदीचा विषय पुढे आला. त्या अनुषंगाने राजकीय वादावादी समोर आली. भाजपाप्रणित नेते हिंदीला पाठिंबा देतील. हिंदीचा मुद्दा महाराष्ट्रात आणला जातोय.कारण, सत्ताधारी भाजपा आहे. भाजपाला नमवायचं असेल तर किंवा भाजपासमोर आव्हान उभं करायचं असेल तर जितके तुकडे राजकीय पक्षाचे तिकडे भाजपासमोर आव्हान आणणं कठीण आहे”, असं राजकीय गणितही त्यांनी मांडलं.

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सविस्तर विश्लेषण तुम्ही वरील व्हिडिओवर क्लिक करून ऐकू शकता.