तरुणाईचा जल्लोषपूर्ण सहभाग, वेगळय़ा धाटणीच्या एकांकिकेचे वैविध्यतेने केलेले सादरीकरण, मनाला भिडणारे संवाद, जीव ओतून केलेला अभिनय आणि कलाकारांची समरसता, अशा सळसळत्या वातावरणात आज, मंगळवारी ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या नगरमधील प्राथमिक फेरीची तिसरी घंटा न्यू टिळक रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात वाजली.

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि केसरी, क्रिएटिव्ह अ‍ॅकॅडमी, पुणे व झी युवा यांच्या सहकार्याने होणाऱ्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत आयरिस प्रॉडक्शन हे टॅलेंट पार्टनर म्हणून सहभागी आहेत, तसेच ‘अस्तित्व’ संस्थेच्या सहकार्यातून स्पर्धेची प्राथमिक फेरी नगरच्या केंद्रावर उत्साहात पार पडली.

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या ज्येष्ठ रंगकर्मी वर्षां घाटपांडे यांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’चा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगून, नगर जिल्हय़ाने आजपर्यंत अनेक दिग्गज कलावंत रंगभूमी व सिनेसृष्टीला दिले आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून चांगले कलावंत तयार होतील, स्पर्धेत अत्यंत चांगले सादरीकरण पाहायला मिळाले, असेही त्यांनी सांगितले. दुसरे परीक्षक व ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप जोगळेकर यांनी स्पर्धेत उत्तम सादरीकरण झाल्याचा अभिप्राय नोंदवला. नवोदितांचे लेखनकौशल्यही उत्तम होते. स्पर्धेत वेगवेगळे विषय हाताळले गेले. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास या स्पर्धेच्या माध्यमातून चांगले कलावंत निर्माण होतील, असेही त्यांनी सांगितले.

स्पर्धेतील एक स्पर्धक कृष्णा वाकळे याची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती. तो म्हणाला, ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा म्हणजे महाविद्यालयीन तरुणाईसाठी नवचैतन्य व ऊर्जा निर्माण करणारी स्पर्धा ठरली आहे. मागील वर्षीही मी या स्पर्धेत सहभागी झाले होतो. आम्हा नवोदित कलाकारांसाठी ही स्पर्धा म्हणजे एक हक्काचे व्यासपीठ असते. स्पर्धेचे नियोजन व संयोजन नेटके व उत्तम असते. त्यामुळेच स्पर्धेतील सातत्य आम्ही कायम ठेवले आहे, असेही तो म्हणाला.

परीक्षक दिलीप जोगळेकर व वर्षां घाटपांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून नटरंगाचे प्रतिमापूजन करून उद्घाटन करण्यात आले. या वेळी ‘लोकसत्ता’च्या नगर आवृत्तीचे ब्युरो चीफ महेंद्र कुलकर्णी, वितरण विभागाचे मुख्य व्यवस्थापक मुकुंद कानिटकर, उपव्यवस्थापक (वितरण) रमेश गोरे, सहायक व्यवस्थापक (वितरण) संतोष बडवे व अविनाश कराळे (जाहिरात) आदी उपस्थित होते. स्पर्धेत अस्थायी (न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, नगर), आंतरपाठ (राजर्षी शाहू महाराज कॉलेज, देवळाली प्रवरा, राहुरी), अर्धवट गोष्ट (पेमराज सारडा ज्युनिअर कॉलेज, नगर), खटारा (न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचा सांस्कृतिक विभाग) व अर्धागिनी (पेमराज सारडा वरिष्ठ कॉलेजचा इन्स्टिटय़ूट विभाग, नगर) या एकांकिका सादर झाल्या.

विभागीय फेरीसाठी ३ एकांकिका : नगर केंद्रावर प्राथमिक फेरीत सादर झालेल्या एकांकिकेतून विभागीय फेरीसाठी तीन एकांकिकांची परीक्षकांनी निवड केली. अर्धागिनी (पेमराज सारडा वरिष्ठ कॉलेज, नगर), खटारा (न्यु आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, डीसीएस) व अर्धवट गोष्ट (पेमराज सारडा ज्युनिअर कॉलेज) या एकांकिकांची विभागीय फेरीसाठी निवड करण्यात आली.

Story img Loader