राज्यात सध्या सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री पदी असणाऱ्या अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभव हा पवार कुटुंबासाठी मोठा धक्का होता असं पार्थ यांचे चुलत बंधू आणि कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण फळीतील नेतृत्व आणि पवार कुटुंबातील पुढील पिढीचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये पार्थ यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीकडे पाहून मतदान करण्याऐवजी लोकांनी मोदींकडे बघून मतदान केल्याचंही म्हटलं आहे.

नक्की वाचा >> पार्थ पवार आणि तुमच्यात मतभेद होते का?; रोहित पवार म्हणतात… 

मावळ मधला पार्थ पवार यांचा पराभव एक धक्का होता का? एक कुटुंबीय म्हणून, एक भाऊ म्हणून काय सांगाल असा प्रश्न रोहित यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रोहित यांनी, “१०० टक्के तो आमच्यासाठी धक्का होता,” असं म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी, “या पराभवाला दुसरी बाजू पण होती. ती अशी की त्यावेळी देशामध्ये वातावरणच तशाप्रकारचं (भाजपाच्या बाजूने) होतं. तुम्ही जरं पाहिलं तर २०१४ आणि २०१९ मध्ये केंद्र सरकारच्या निकालात भाजपाच्या जागांमध्ये वाढच झाल्याचं आपण बघितलं होतं. त्यावेळी एकदम अ‍ॅग्रेसिव्हली लोकांचं मत मोदी साहेबांकडे बघून त्या व्यक्तीच्या बाजूने गेलं. हे दुर्देवी आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींकडे पण बघायला हवं होतं. ते कदाचित बघितलं गेलं नाही,” असंही रोहित म्हणाले.

“पार्थ मनाने चांगला पण कधीकधी तो…”

पार्थ कसा आहे?, या प्रश्नाला उत्तर देताना रोहित यांनी, “पार्थबद्दल बोलायचं झालं तर तो मनाने फार चांगला आहे. निर्णय घेताना कधीकधी तो अचानक निर्णय घेण्याचा प्रयत्न तो करतो. पण आम्ही जेव्हा एकत्र असतो तेव्हा एकमेकांसोबत विनोद करणं. भावंडं म्हणून एकमेकांची चेष्टा मस्करी करणं, हे सारं आम्ही करत असतो,” असं उत्तर दिलं.

नक्की वाचा >> शरद पवारांनी विचारलेला ‘तो’ प्रश्न आणि कर्जत-जामखेडमधून निवडणूक लढण्याचा निर्णय; रोहित पवारांचा खुलासा

आठवणीत रमले रोहित पवार

पार्थ पवार यांच्याशी तुमचे संबंध कसे आहेत?, असा प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रोहित यांनी, “चांगलेच आहेत. माझा भाऊ आहे. मी त्याच्यापेक्षा थोडासा वयाने मोठा आहे. लहानपणी आम्ही एकत्र क्रिकेट खेळायला जायचो, कधी ट्रॅक्टरमधून फिरायला जायचो. दिवाळी यायची तेव्हा अजितदादा आमच्यासाठी पोतं भरुन फटाके आणायचे. मग आम्ही सर्व भावंड दिवाळीला एकत्र जामयचो तेव्हा ते फटाके वाटून घ्यायचो आणि नंतर एकत्र फोडायचो,” अशा जुन्या आठवणी सांगितल्या.