महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा असलेल्या मोजक्या घराण्यांपैकी एक म्हणजे पवार घराणे. या पवार कुटुंबियातील तरुण पिढी आता राजकारणात पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करत आहे. याच पिढीत एक नाव म्हणजे कर्जत-जामखेडचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण फळीतील नेतृत्व आणि पवार कुटुंबातील पुढील पिढीचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये पवार कुटुंबातील प्रमुख राजकीय व्यक्तीमत्वांसंदर्भात त्यांना आवडणाऱ्या गोष्टींबद्दल भाष्य केलं आहे.

नक्की वाचा >> शरद पवारांनी विचारलेला ‘तो’ प्रश्न आणि कर्जत-जामखेडमधून निवडणूक लढण्याचा निर्णय; रोहित पवारांचा खुलासा

आजोबा म्हणून शरद पवार कसे वाटतात?, काका अजित पवार आणि आत्या म्हणून सुप्रिया सुळे तुम्हाला कशा वाटतात?, असा प्रश्न मुलाखतीदरम्यान रोहित पवार यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना रोहित यांनी, “शरद पवारांबरोबर चर्चा करताना अभ्यास केल्याशिवाय त्यांच्यासमोर जाऊ नये. त्यांना लगेच अंदाज येतो की या व्यक्तीने अभ्यास केलाय की याला नुसतीच चर्चा करायची आहे. तसं पहायला गेलं तर कोणाताही विषय घेतला तरी त्यांचा अभ्यास त्यामध्ये असतो. जेव्हा ते त्यांच्या पूर्वीच्या मतदारसंघासाठीचा असो किंवा राज्यासाठी अथवा देशाच्या हितासाठी असो शरद पवार जेव्हा निर्णय घेतात तेव्हा ते दूरदृष्टीने लोकांचं हित जोपासत असतात. हा त्यांचा गुण मला फार आवडतो,” असं सांगितलं. तर आत्या सुप्रिया यांच्यासंदर्भात बोलताना रोहित यांनी, “सुप्रिया सुळे यांची एखादी गोष्ट मुद्देसूदपणे मांडण्याची पद्धत आहे ती मला फार भावते,” असं उत्तर दिलं.

नक्की वाचा >> “राजकीय शरद पवार कोणालाच कळणार नाहीत”

नक्की वाचा >> : “पार्थ मनाने खूप चांगला पण निर्णय घेताना कधीकधी अचानक…”; रोहित पवारांचे रोखठोक मत

त्याचप्रमाणे अजित पवार हे तातडीने काम करतात आणि कोणतही काम नंतर करु म्हणून शिल्लक ठेवत नाहीत असं रोहित म्हणाले. “अजितदादांच्या बाबतीत, काम काय आहे?, लगेच फोन उचलायचा, फोन करायचा आणि काम करायचं. किंवा कुठलीही गोष्ट नंतर करु म्हणून मागे ठेवायची नाही हे गुण मला चांगले वाटतात,” असं रोहित पवार म्हणाले. आपल्या कुटुंबातील राजकीय व्यक्तींसंदर्भात बोलताना रोहित यांनी, “प्रत्येकाची वेगळी स्टाइल आहे. जेव्हा कुटुंब येतं तेव्हा सगळे समान असतात. मनमोकळेपणा गप्पा मारतात. त्यात राजकारण काहीच नसतं. मस्त आम्ही भेटल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा मारतो,” असं सांगितलं.

Story img Loader