महाराष्ट्रामध्ये २०१९ साली झालेल्या निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघामधून निवडून आलेले राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हाच मतदारसंघ का निवडला यासंदर्भातील खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण फळीतील नेतृत्व आणि पवार कुटुंबातील पुढील पिढीचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये २०१९ च्या निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि रोहित यांचे आजोबा शरद पवार यांच्याशी झालेल्या संवादासंदर्भात खुलासा केला.

नक्की वाचा >> “राजकीय शरद पवार कोणालाच कळणार नाहीत”

शरद पवार यांनी दूरदृष्टीने विचार करुन रोहित पवार यांना राजकारणात आणण्याचा निर्णय घेतलेला आहे का?, या प्रश्नाला उत्तर देताना रोहित यांनी मतदारसंघ निवडण्यापूर्वी झालेल्या चर्चेबद्दल सांगितलं. “निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा विचार केला जात होता. तेव्हा नक्की कुठून निवडणूक लढवायची याची चर्चा सुरु होती. त्यावेळी मला शरद पवार यांनी विचारलं की, “सोपा मतदारसंघ विचार करत असशील तर असे अनेक मतदारसंघ असू शकतात की ज्या ठिकाणी तू निवडून येऊ शकतो. पण तुला एकदाच आमदार व्हायचं आहे की तुला सातत्याने त्या ठिकाणी काम करुन, चांगलं काम करुन, लोकांचं प्रेम मिळवून तिथून सातत्याने आमदार म्हणून निवडून येत एक वेगळं मॉडेल निर्माण करायचं आहे का?” त्यांच्या या प्रश्नाला एकच उत्तर होतं की ज्या ठिकाणी चांगलं काम करता येईल, जिथे कामच झालेलं नाही, जिथे वेगळं काहीतरी आपण निर्माण करुन दाखवू शकतो ज्याचा सर्वासामान्य लोकांना फायदा होईल असं ठिकाण निवडायचं म्हणून मी कर्जत-जामखेड ठिकाण निवडलं. तिथं लोकं प्रेमळ आहेत पण विकास हा कधीच झाला नाही,” असं रोहित पवार म्हणाले.

नक्की वाचा >> : “पार्थ मनाने खूप चांगला पण निर्णय घेताना कधीकधी अचानक…”; रोहित पवारांचे रोखठोक मत

शरद पवारांनी आपल्याला राजकारणात आणलं असलं तरी मी कुठपर्यंत जाणार हे माझ्या कामगिरीवर अवलंबून असल्याचं रोहित यांनी सांगितलं. “शरद पवार हे दूरदृष्टीने विचार करुनच एखाद्या व्यक्तीला संधी देत असतात. मग ती व्यक्ती कुटुंबातील असो किंवा कुटुंबाच्या बाहेरची असो हा निर्णय नेतेमंडळी घेऊ शकतात. पण निवडून आल्यानंतर तुम्ही वागता कसं?, काम करता कसं?, तुमची क्षमता किती आहे?, काम करत असताना तुम्ही एखाद्याची कॉपी करता की स्वत:ची ओळख जपात? हे सारे तुमचे निर्णय त्या ठिकाणी असतात. त्यामुळे लांबपर्यंत टीकणं हे माझ्यावर आहे. जे मी त्यांच्या विचाराने आणि तिथं अनेक असे लोकं आहे ज्यांच्याकडून मी काही ना काही शिकत असतो. अशा गोष्टींचा विचार करुन मी लोकांचं हित डोक्यात ठेवलं तर मला विश्वास आहे की जास्त दिवस, जास्त काळ या ठिकाणी टिकून मला लोकांची सेवा करता येईल,” असं रोहित म्हणाले.