आम आदमी पार्टी व भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांच्या निदर्शनांमुळे दिल्ली विधानसभा अचानकपणे दिवसरात्र निदर्शनांचं केंद्र बनलं आहे. अरविंद केजरीवालांच्या आपचे नेते लेफ्टनंट गव्हर्नर व्ही.के. सक्सेना यांच्याविरोधात चौकशीची मागणी करत आहेत. २०१६ मध्ये खादी व ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष असताना दोन कर्मचाऱ्यांवर १,४०० कोटी रुपयांचे नोटाबंदी झालेले चलन बदलण्याचा दबाव आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर दुसरीकडे भ्रष्टाचाराचे आरोप करत मनीष सिसोदिया व सत्येंद्र जैन या मंत्र्यांना निलंबित करावं, अशी मागणी करत भाजपा निदर्शने करत आहे. खादी घोटाळा काय आहे व दिल्ली विधानसभेत काय नाट्य घडतंय यावर टाकलेला हा प्रकाश…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१,४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेला खादी घोटाळा काय आहे?

सोमवारी आपचे आमदार दुर्गेश पाठक यांनी आरोप केला की, लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनी दोन कर्मचाऱ्यांवर नोटाबंदी असलेलं १,४०० कोटी रुपयांचे चलन बदलण्यासाठी दबाव टाकला होता. “ज्यावेळी सक्सेना केव्हीआयसीचे अध्यक्ष होते त्याचवेळी नोटाबंदी झाली होती. तिथल्या रोखपालानं लेखी दिलंय की, नोटा बदलण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात आला होता. दुर्दैव म्हणजे त्याला निलंबित करण्यात आलं. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. यासंदर्भात बातम्याही आल्या आहेत आणि फटका बसलेल्या कर्मचाऱ्यांनी जबाबही दिले आहेत,” असं पाठक यांनी कथित घोटाळ्यासंदर्भात म्हटले आहे.

संपूर्ण देश जेव्हा रोख पैशांची चणचण अनुभवत होता, लाखो लोकांनी रोजगार गमावला आणि अगणित लोक उपाशीपोटी झोपत होते, तेव्हा व्ही.के. सक्सेना यांनी १,४०० कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आपच्या आमदाराचा आरोप आहे. केव्हीआयसीच्या दोन रोखपालांनी हा घोटाळा उघडकीस आणला. त्याची चौकशी सक्सेनांनीच केली व त्या दोघांनाच निलंबित केल्याचा दावा पाठक यांनी केला आहे.

“खादी ग्रामोद्योगच्या दिल्लीतील शाखेमधून २२ लाख रुपयांच्या चलनाचा बेकायदेशीर व्यवहार झाल्याचे रोखपाल प्रदीप यादव व संजीव कुमार यांनी उघडपणे सांगितले आहे. याच प्रकारे भारतभरातील खादी ग्रामोद्योगच्या सात हजार शाखांच्या माध्यमातून घोटाळा घडला आहे,” असं पाठक म्हणतात.

घोटाळ्याचा आरोप करत आम आदमी पार्टीचे आमदार सोमवारी विधानसभेमध्ये घुसले आणि त्यांनी लेफ्टनंट गव्हर्नरनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. या प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभाग व सक्तवसुली संचालनालयाच्या मार्फत चौकशी करावी, अशीही आपची मागणी आहे.

रात्रभर निदर्शने

आपनं असाही पवित्रा घेतला की, विधानसभेच्या आवारात लेफ्टनंट गव्हर्नरांच्या विरोधात रात्रभर निदर्शने करण्यात येतील. ‘सक्सेना चोर है, सक्सेना को अरेस्ट करो’ असे फलक झळकावत आपच्या आमदारांनी विधानसभेच्या आवारात ठिय्या ठोकला होता. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार निदर्शने करताना आपच्या आमदारांनी रघुपती राघव राजाराम हे भजन गायलं आणि त्याला काही आमदारांनी गिटार व ढोल वाजवून साथ दिली.

जोपर्यंत लेफ्टनंट गव्हर्नरांच्या विरोधात सीबीआयची चौकशी सुरू होत नाही तोपर्यंत निदर्शने मागे घेणार नसल्याचा पवित्रा आपच्या आमदारांनी घेतला आहे.

भाजपाची प्रतिक्रिया

आम आदमी पार्टी व लेफ्टनंट गव्हर्नर यांच्यातील वादात भाजपानं उडी घेतली आहे. सक्सेना यांची पाठराखण करताना भाजपानं सोमवारी सांगितले की बदला घेण्यासाठी आप असले आरोप करत आहे. “या पदावर रुजू झाल्यापासून सक्सेनांनी केजरीवाल सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. मग ते दिल्ली सरकारची एक्साइज पॉलिसी असो, सरकारी शाळांमधल्या वर्गखोल्यांचे बांधकाम असो. आपल्या गैरकारभारावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आप असले आरोप करत आहे,” असा दावा भाजपाचे रोहिणीतील आमदार विजेंदर गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

हेही वाचा : विश्लेषण : रोहिंग्या : निर्वासित की बेकायदा स्थलांतरित?

आपला विरोध दर्शवताना भाजपाच्या नेत्यांनीही सोमवारी रात्री दिल्ली विधानसभेच्या आवारात धरणे धरले होते. मनीष सिसोदिया व सत्येंद्र जैन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना निलंबित करावं, अशी मागणी भाजपानं केली आहे. भाजपाचे आमदार ओ.पी. शर्मा यांनी तर आपचे नेते ‘देशद्रोही व अर्बन नक्षल’ असल्याचा आरोप केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained on aap and bjp political fight outside delhi assembly pbs
Show comments