‘लोकसत्ता लोकांकिका’ ही आंतरराज्य महाविद्यालयीन स्पर्धा आठ वेगवेगळ्या विभागांतून घेण्यात येते. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी अशा आठ विभागांमध्ये प्राथमिक फेरी आणि विभागीय अंतिम फेरी अशा दोन टप्प्यांवर ही स्पर्धा होते. एकांकिकांचे परीक्षण करण्यासाठी दरवर्षी रंगभूमीवरील अनुभवी, लोकप्रिय कलावंत, लेखक, दिग्दर्शक, समीक्षक, नेपथ्यकार अशी मान्यवर मंडळी करतात. त्या त्या शहरात जाऊन या स्पर्धेच्या निमित्ताने निव्वळ परीक्षक म्हणून एकांकिका पाहणे इतपत स्वत:ला मर्यादित न ठेवता या मान्यवरांनी स्पर्धकांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. त्यांच्या अनुभवी नजरेला जाणवणाऱ्या त्रुटी आणि त्यासाठी या स्पर्धकांनी कशा पद्धतीने सुधारणा करायला हव्यात, याचे मार्गदर्शनही या अनुभवी रंगकर्मींकडून कलाकारांना वेळोवेळी केले जाते. काही रंगकर्मी सातत्याने ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेशी परीक्षक या नात्याने जोडले गेले आहेत. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची व्याप्ती, युवा रंगकर्मींचे सादरीकरण, त्यांचे विषय, मांडणी याचबरोबर या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या युवा कलाकारांना काय फायदा होतो, यासंबंधी रंगकर्मींनी नोंदवलेले निरीक्षण आणि त्यांचे अनुभव त्यांच्याच शब्दांत…
आपल्या मातीतील विषय
‘लोकसत्ता’ गेली नऊ वर्षे ‘लोकांकिका’ हा उपक्रम राबवीत आहे. महाराष्ट्रातील युवकांना एक दमदार व्यासपीठ लोकांकिकेच्या निमित्ताने उभारण्यात लोकसत्ता वृत्तपत्राला यश मिळाले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतील रंगकर्मी विद्यार्थ्यांसाठी लोकांकिकामुळे एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या व्यासपीठाचा फायदा घेऊन तरुण मंडळी वेगवेगळे विषय हाताळत असतात. यासाठी या तरुणांना त्यांच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि प्राध्यापकांचे चांगले सहकार्य मिळते. यावर्षीच्या ठाणे केंद्रात झालेल्या एकांकिका याला अपवाद नव्हत्या. ठाणे विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका आणि प्राथमिक फेरीत सादर झालेल्या एकांकिकांच्या विषयात वैविध्य होते. त्याला या मातीचा सुगंध होता. या एकांकिका रंगकर्मी विद्यार्थ्यांनी मनस्वीपणे सादर केल्या, तसेच विषय थेटपणे मांडले. एखादा उत्तम अभिनेता किंवा अभिनेत्री असल्याची जाण त्यांनी परिक्षकांना करून दिली. त्यांच्या अभिनयामध्ये सहजता होती, तसेच विषयाला ते चांगल्याप्रमाणे सामोरे गेले.
- डॉ. अनिल बांदिवडेकर, लेखक, दिग्दर्शक, रंगकर्मी
समकालीन विषय आणि प्रयोगशील सादरीकरण
‘लोकसत्ता’ आयोजित ‘लोकांकिका’ उपक्रम अत्यंत उत्तम आहे. यावेळी लोकांकिकांच्या निमित्ताने रंगकर्मी विद्यार्थ्यांना स्पर्धेपूर्वी देण्यात आलेले ऑनलाइन प्रशिक्षणही उपयुक्त ठरले आहे. विद्यार्थी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असून वेगळ्या प्रकारचे विषय हाताळत आहेत. यंदा ठाणे विभागीय अंतिम फेरीत सर्वच विद्यार्थ्यांचे अभिनय आणि सादरीकरण उच्च दर्जाचे होते. विद्यार्थी सादर करत असलेल्या एकांकिकांचे बरेच विषय समकालीन तर, काही मूलभूत स्वरूपाचे असतात. या विषयांवरील सादरीकरण हे नावीन्यपूर्ण आणि प्रयोगशील असते. या एकांकिकेच्या माध्यमातून काही समकालीन प्रश्न उपस्थित केले जातात, तर काही एकांकिकांमध्ये देशी अनुभव (मातीतले प्रश्न) सादर केले जातात. विशेषत: वाङ्मय साहित्याचा आधार घेऊन विद्यार्थी कलाकृती सादर करत आहेत. याचा अर्थ विद्यार्थी विविध पुस्तके वाचत आहेत, याचे कौतुक आहे. त्यामुळे लोकांकिका हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक वाढीसाठी उपयुक्त आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील त्यांच्या भागातील प्रश्न घेऊन या ठिकाणी एकांकिका सादर करतात हे फार महत्त्वाचे आहे.
- निळकंठ कदम, कवी, समीक्षक
प्रस्थापितांना धक्का देण्याची चुणूक
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या माध्यमातून नाशिक विभागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या कलागुणांचे दर्शन झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेच कमी नसल्याचे दिसले. प्राथमिक फेरीतील एकांकिकांमध्ये वेगवेगळ्या विषयांची विद्यार्थ्यांनी मांडणी केली. त्यात गावातील मूलभूत प्रश्न, रूढी यांसह प्रेमाला महत्त्व की करिअरला, रोजच्या जीवनातील साध्या विषयांची मांडणी करताना विद्यार्थ्यांनी दाखविलेले वेगळेपण कौतुकास्पद म्हणावे लागेल. लोककला आणि बोलीभाषेचा ताकदीने वापर करण्यात आला. अनुभवी रंगकर्मींकडून होणाऱ्या मार्गदर्शनाची उणीव असतानाही या विद्यार्थ्यांनी जे कलागुण दाखविले, त्यांना दाद द्यावीच लागेल. ग्रामीण भागातील युवकांमध्येही प्रस्थापितांना धक्का देण्याची चुणूक दिसून आली.
- सुहास भोसले (ज्येष्ठ दिग्दर्शक, परीक्षक)
रंगभूमीची व्यवस्थित जाण
नाशिक विभागातील प्राथमिक फेरीत सादर झालेल्या एकांकिकांमधील वेगळेपण विषयांमध्येही दिसून आले. आपआपल्या भागातील समस्या मांडण्याची भूक जाणवली. नाते संबंधांमध्ये असणारा ताण, विकासाच्या नावाखाली ग्रामस्थांना होणारा त्रास, धर्माच्या नावाखाली होणारे राजकारण, हे ग्रामीण भागाला भेडसावणारे विषय एकांकिकांमध्ये आले. विद्यार्थ्यांची ऊर्जा वाखाणण्यासारखी होती. काही एकांकिकांमध्ये कलाकारांची संख्या अधिक असतानाही रंगमंचाचा प्रभावी वापर करण्यात आला. एकांकिकेतील प्रत्येक पात्राचा विचार करत विद्यार्थ्यांनी भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांचे निरीक्षण, भूमिकेविषयी असलेले आकलन आणि सादरीकरण लाजवाब होते. ग्रामीण कलाकारांनाही आता रंगभूमीच्या सर्व बाबी व्यवस्थितपणे समजू लागल्याचे त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवरून जाणवले. ‘लोकसत्ता आयोजित लोकांकिका’ स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण गुणवत्ता पुढे आली आहे.
- अंशु सिंग , ज्येष्ठ दिग्दर्शककलाकार, परीक्षक
कालसापेक्ष विषयांची मांडणी
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेने महाविद्यालयीन विश्वात आता आपली चांगलीच ओळख निर्माण केली आहे. राज्य पातळीवर वेगवेगळ्या ठिकाणी सादर झालेल्या एकांकिकांचे मुंबई येथे अंतिम फेरीत एकत्रित सादरीकरण होते हे या स्पर्धेचे वेगळेपण म्हणता येईल. नाशिक विभागीय केंद्राच्या अंतिम फेरीत सादर झालेल्या एकांकिकांमध्ये हिंदू-मुस्लिम, देऊळ की पूल असे अनेक कालसापेक्ष विषय मांडण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून करण्यात येणारे प्रयत्न स्तुत्य आहेत. काळाबरोबर असणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. नवीन मुले हा प्रयत्न करत आहेत, हे महत्वाचे आहे. सादरीकरणात स्पर्धकांना अजूनही बरेच काही करता येऊ शकते. त्यादृष्टीने सर्वांनीच विचार करावा. जीवन संदर्भ प्रेक्षकांपर्यंत जाणे हे गरजेचे आहे. ते लोकांकिकेच्या माध्यमातून साध्य होत असल्याचा आनंद आहे.
- प्रेमानंद गज्वी, ज्येष्ठ रंगकर्मी
विद्यार्थ्यांसाठी चांगले व्यासपीठ
या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक महाविद्यालये जोडली गेली. स्पर्धेचा दर्जा सुधारला जातो आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकांकिकांसाठी विषयाची निवड विचारपूर्वक केल्याचे जाणवले. विषयांची निवड करताना दाखविलेली हुशारी, त्यांची मांडणी आणि सादरीकरण करतानाही होणे आवश्यक आहे. सध्या सादर करण्यात आलेली एकांकिका अधिक चांगल्या पध्दतीने कशी सादर करता येईल, याचा प्रयत्न होणे आवश्यक. विद्यार्थ्यांनी समाजाला जे विषय भेडसावत आहेत, ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याद्वारे एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे.
- देवेंद्र पेम, लेखक दिग्दर्शक
भाषा ही प्रमाण असायला हवी
‘लोकसत्ता’ने उत्साही रंगकर्मींसाठी प्रतिष्ठित व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. जागतिकीकरणाच्या काळात आज कलांचा विसर पडत असताना, माध्यमांनी असे उपक्रम राबवणे कौतुकास्पद आहे. नागपूरच्या भूमीने मातब्बर लेखक आणि कलावंत दिले आहेत. महेश एलकुंचवार, श्याम पेटकर अशा अनेक साहित्यिकांची नावे घेता येतील. त्यांचा आदर्श आजच्या पिढीने घेण्याची गरज आहे. ज्याला लेखक बनायचे आहे त्याने समाजात वावरायला हवे. आपल्या समाजात दिसणाऱ्या गोष्टींमधूनच आपल्याला विषय मिळतात. तो डोळसपणा लेखकाकडे हवा. कुणाला दिग्दर्शक बनायचे असेल तर त्याने एकांकिकेतील बारकावे पाहायला हवेत. दोन-चार चित्रपट पाहिले की मीसुद्धा आता दिग्दर्शन करू शकतो, अशी भूमिका घेऊन चालणार नाही. त्यासाठी कठोर मेहनत आणि एखाद्या दर्जेदार दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करण्याची तयारी ठेवावी लागते. कलावंताने भाषेवर, व्याकरणावर काम करण्याची गरज आहे. आपण कुठल्याही प्रदेशातून आलो असलो तरी भाषा ही प्रमाण असायला हवी.
- मकरंद अनासपुरे, अभिनेता
एकांकिका हे सांघिक कौशल्य…
महाविद्यालयीन तरुणांच्या विश्वात आपला स्वतंत्र ठसा उमटवणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा कौतुकास्पद आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याची संधी मिळते. ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या विभागीय अंतिम फेरीमध्ये आलेल्या पाचही एकांकिका दर्जेदार होत्या. सर्वच नटांनी उत्तम काम केले. मी स्वत:ही कोल्हापूर ते मुंबई असा करिअरचा प्रवास केला आहे. त्यामुळे एकांकिका बघताना स्वत:च्या जुन्या आठवणींमध्ये रमलो. एकांकिका करताना काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष देण्याची गरज आहे. एकांकिकेतील नट कितीही चांगला असला तरी त्याला मिळणारे लेखक आणि दिग्दर्शक उत्तम असायला हवेत. त्यामुळे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी एकांकिका निवडताना त्याचे लेखक आणि दिग्दर्शक कसे आहेत?, कोण आहेत? याची चाचपणी करावी. एकांकिका हे सांघिक कौशल्य आहे. त्यामुळे नटाबरोबरच लेखक आणि दिग्दर्शक दर्जेदार असेल तर एकांकिका पुन्हा उत्तम करता येऊ शकते.
प्रियदर्शन जाधव, अभिनेता, लेखक, दिग्दर्शक
कौतुकास्पद उपक्रम
‘लोकसत्ता लोकांकिका’ हा कौतुकास्पद उपक्रम आहे. या एकांकिकांमध्ये नवीन संहिता, नवीन चेहरे असतात. रंगभूमीच्या उत्कर्षासाठी हे महत्त्वाचे आहे. राज्यभर होत असल्याने ही संपूर्ण महाराष्ट्राची स्पर्धा झाली आहे. भविष्यातील कलावंत घडवणारे व्यासपीठ ‘लोकसत्ता’ने दिले त्यासाठी अभिनंदन. कलावंताला त्याच्या कामाची आवड असणे फार आवश्यक आहे. प्रत्येक पात्रावर त्याने जिवापाड प्रेम केले तर रसिकांच्या मनात तो कायम घर करून जातो. ग्रामीण आणि छोट्या शहरांतील ज्या विद्यार्थ्यांना कलावंत, लेखक, दिग्दर्शक व्हायचे आहे त्यांच्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे.
- अनिल पालकर, ज्येष्ठ रंगकर्मी
वैविध्यपूर्ण सादरीकरण
विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण केले. एकांकिकांच्या विषयांमध्ये वैविध्य होते. युवा पिढी चांगला विचार करते हे जाणवले. हे विद्यार्थी केवळ विचारच करत नाहीत तर विचारांची देवाणघेवाणही करतात. एकाहून एक सरस एकांकिका पाहताना मलाही खूप काही शिकता आले. नव्या पिढीसाठी नकाराचा सूर आळवला जात असताना या स्पर्धेतून आशेचा किरण निर्माण झाला आहे. यातूनच भविष्यातील कलावंत आणि लेखक तयार होणार आहेत. ज्यांना या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांनी मेहनत घेणे आणि बारकावे शिकणे फार आवश्यक आहे.
- मुकुंद वसुले, ज्येष्ठ रंगकर्मी
लोकांकिकेचा अनुभव विद्यार्थ्यांनी घ्यावा
‘लोकांकिका’ हा उपक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘लोकसत्ता’चा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. लोकांकिकेचा अनुभव प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यावा. सामाजिक विषयांबरोबरच इतर काही विषय लोकांकिकेच्या माध्यमातून दरवर्षी पाहायला मिळतात. उत्तम कलाकृती, नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीत या साऱ्या गोष्टींची जाण विद्यार्थ्यांना आहेच आणि लोकांकिकेमुळे ती आणखी समृद्ध होण्यास मदत होते. तसेच यंदा ‘रंगसंवाद’ हा जो उपक्रम ‘लोकसत्ता’ने सुरू केला आहे. ती एक उत्तम सुरुवात आहे आणि गरजदेखील आहे.
- गिरीश पत्के, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते
एकांकिका हे कलाकारांसाठी महत्त्वाचे माध्यम
दरवर्षी लोकांकिकेमुळे दरर्जेदार एकांकिका पाहायला मिळतात. विविध विषयांची ओळख होते. लोकांकिकेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळते. तसेच, लोकांकिकेचा अनुभव घेतलेल्या विद्यार्थ्यांस भविष्यात हा अनुभव उपयोगी पडतो. यामुळे लोकांकिकेचा अनुभव हा एकदातरी घ्यावाच. नवीन विद्यार्थ्यांशी ओळख होते. एकांकिका हे कलाकरांसाठीचे एक महत्त्वाचे माध्यम आहे.
- डॉ. श्वेता पेंडसे, लेखिका व अभिनेत्री
स्पर्धेच्या दर्जाने वेगळीच उंची गाठली
लोकांकिका मुंबई विभागीय अंतिम फेरी खूपच छान झाली. दरवर्षीप्रमाणे उत्तम नियोजन होते. आशयप्रधान संहिता, अणि उत्कृष्ट मांडणीमुळे स्पर्धेचा दर्जा वेगळ्याच उंचीवर गेला होता. तांत्रिक बाबींवरही प्रत्येक महाविद्यालयाने विशेष लक्ष दिल्याचे जाणवले. ‘लोकसत्ता’द्वारे केल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे नवोदित कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ घडायला नक्कीच मदत होणार आहे.
- संदेश बेंद्रे, नेपथ्यकार
उत्तम कलाकार घडवणारे व्यासपीठ
‘लोकसत्ता लोकांकिकां’मुळे विद्यार्थांना स्वत:चे परीक्षण करता येते. तसेच आम्हाला उत्कृष्ट एकांकिकादेखील पाहायला मिळतात. हे एक असं व्यासपीठ आहे जे उत्तम कलाकार घडवतो. प्रत्येक विद्यार्थ्याने या संधीचा पुरेपूर उपयोग करावा.
- संतोष पवार, लेखक, दिग्दर्शक व अभिनेते
संवदेनशील कलाकार
महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमुळे कलाकारांना नवे व्यासपीठ मिळते. मराठवाड्यातून आपल्या भागातील समस्यांकडे तरुण कसे बघतो हे कळते. तो हे सर्व विषय संवेदनशीलतेने बघतो आणि त्याचे सादरीकरण करतो आहे असे दिसते. त्याकडे नाटक म्हणून बघताना या समस्यांकडेही आता संवेदनशीलतेने बघण्याची गरज असल्याची दृष्टी हे कलाकार देत असतात.
- अमेय दक्षिणदास, रंगकर्मी
महाविद्यालयांना कलाकारांना प्रोत्साहन
‘स्पर्धा उत्तमरीत्या पार पडल्या. वेगवेगळे विषय सादर झाले. अशा स्पर्धांमुळे महाविद्यालयीन कलाकारांना प्रोत्साहन मिळते. ग्रामीण भागातून मुलींची संख्या वाढते आहे. शिरसाळासारख्या छोट्या गावातून मुलींच्या एका संघाचे सादरीकरण झाले. अशा घटना प्रेरणा देणाऱ्या ठरतील.’
- नितीन धंदुके, रंगकर्मी
सकस विषय मांडणी
अशा प्रकारच्या स्पर्धांमधून महाविद्यालयीन तरुणांना संधी मिळतेच, पण यातून विधायक विषय कळतात. विद्यार्थी विषय कसा हाताळतात हे कळते. एक प्रकारची ऊर्जा असते या प्रयोगांमध्ये… पिढीगणिक विचार बदलतात. आजची तरुण मुले एखादा विषय मांडताना अधिक सकस, अधिक उजवे असल्याचे वाटते. या बदलाचा साक्षीदार होण्यास मिळाले, याचा आनंद वाटतो.
- धीरेश जोशी, अभिनेता
ग्रामीण भागात विषयवैविध्य अधिक
ग्रामीण भागातील एकांकिकांमध्ये विषयवैविध्य अधिक
या स्पर्धांमुळे नवे विषय कळत आहेत. विशेषत: शहरी विषयांपेक्षा ग्रामीण भागातील विषयांमध्ये वैविध्य आहे. मात्र, ठरवून दिलेल्या वेळेत, योग्य तपशील कसे वापरावेत याविषयी अधिक सजग राहण्याची गरज आहे. ‘लोकसत्ता’मुळे महाराष्ट्रभर कलावंतांना अधिक संधी निर्माण झाल्या आहेत.
- विजय पटवर्धन, अभिनेता
विद्यार्थ्यांच्या जवळचे विषय
आम्हाला दरवर्षी ‘लोकसत्ता लोकांकिकां’च्या परीक्षणासाठी कोणत्या तारखांना कुठे जायचं आहे याची उत्सुकता असते. स्पर्धकांसाठी विनाकटकट आयोजन केलं जात असल्याचं जाणवतं. यावर्षी कोल्हापूर केंद्रात विषय विद्यार्थ्यांच्या जवळचे आणि आजचे वाटले. दिग्दर्शक अधिक चांगलं काम करू लागले आहेत असंही जाणवलं. कोल्हापूर केंद्रात सादर होणाऱ्या स्पर्धेतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘लोकसत्ता’ने अधिक सुधारणा होण्यासाठी एखादी कार्यशाळा या भागात घेण्याकरता पुढाकार घ्यावा.
- प्रदीप वैद्य, रंगकर्मी
एकांकिकांमधील आशय उत्तम
कोल्हापूर केंद्रात सादर झालेले विषय चांगले आणि नवे होते. लेखन कार्यशाळेसारख्या उपक्रमांची आणि वाचिक अभिनयाच्या अभ्यासाची आवश्यकता वाटते. मुलांनी एकांकिकेसाठी निवडलेले विषय हे सामाजिक आणि भोवतालचे विषय होते. त्यात आशयही उत्तम होता. महाविद्यालयीन कलाकारांनी मुळातून विषय समजून घेऊन त्याचे चिंतन केल्याचे जाणवले. दिग्दर्शनाचा व अभिनयाचा बारकाईने विचार दिसून आला. नेपथ्य, मोंटाज यातही नाविन्यता होती. -नितीन धंदुके, रंगकर्मी
विषयांची प्रभावी हाताळणी
नवीन पिढी नाटकाकडे कसे बघते किंवा या कलाप्रकाराहून दुरावत तर नाही ना या प्रश्नांशी झुंजत असताना हीच तरुण मंडळी वेधक अशी वेगवेगळ्या विषयांना प्रभावीपणे हाताळताना बघून थक्क झालो. हे तरुण कलाकार त्यांचे विश्व आणि त्यांना पडलेले प्रश्न मांडताना दिसतात. त्यांना असे व्यासपीठ देऊन ‘लोकसत्ता’ने केवळ एक मोठा उपक्रम हाती नाही घेतला, तर एका चळवळीला मार्ग मोकळा करून दिला आहे.
- अजय जोशी, रंगकर्मी
गुणवत्तापूर्ण एकांकिका
तरुणाईची सळसळती नाट्यऊर्जा, रंगभूमीला कुठलीच गोष्ट कमी पडू देणार नाही हा विश्वास इथल्या प्रत्येक संघाच्या सादरीकरणात दिसला. सर्वच महाविद्यालयांच्या एकांकिकांमध्ये गुणवत्ता ठासून भरली होती. लिखाणाचे वेगळेपण जाणवत होते. ‘लोकसत्ता’च्या या स्पर्धेतून रंगभूमीला चांगले लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ मिळतील हा विश्वास हे रंगकर्मी सार्थ करतील! – विश्वराज जोशी, रंगकर्मी
नियोजनबद्ध स्पर्धा
अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली. प्राथमिक फेरीत परीक्षक आणि स्पर्धकांमध्ये अत्यंत पारदर्शक संवाद झाला. स्पर्धकांनी खुल्या मनाने कमतरता स्वीकारल्या. एकांकिकेतील दिग्दर्शकांनी रंगभूमी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे असल्याचे जाणवले. एकांकिका दिग्दर्शित करताना दिग्दर्शक फार विचार करत नसल्यामुळे अनेकांच्या सादरीकरणादरम्यान त्रुटी आढळल्या, ज्यावर काम होणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी सूचना काळजीपूर्वक ऐकून अंमलात आणण्याची तयारी दर्शवली. – मनोहर सुर्वे, रंगकर्मी
महाविद्यालयांचाही सकारात्मक प्रतिसाद हवा
एकांकिकेत लोककला, लोकसाहित्याचा वापर करताना त्याला संवाद आणि अभिनयाचीही जोड हवी, मात्र अनेकदा त्यात त्रुटी दिसतात. प्राथमिक फेरीत लेखकांनी विषय निवड उत्तम केली. समकालीन समस्या मांडण्याचा प्रयत्न केला, पण अभिनय आणि संवादातून ते व्यक्त झाले नाहीत. संवादाला सुसंगत हावभाव नसल्याने सादरीकरणानंतर अभिनयाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शहराबाहेरील तळागाळातील भागांमध्ये ‘लोकसत्ता लोकंकिका’ स्पर्धा पोहोचण्यासाठी आणखी काही उपायोजना करणे आवश्यक आहे.
- रश्मी कशेळकर, रंगकर्मी
प्रायोजक
●मुख्य प्रायोजक : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण
●सहप्रस्तुती : सॉफ्ट कॉर्नर
●सहप्रायोजक : झी टॉकीज, केसरी टूर्स, भारती विद्यापीठ
●पॉवर्ड बाय : एन एल दालमिया, फ्यूजनफ्लिक्स
●साहाय्य : अस्तित्व
●टॅलेंट पार्टनर : आयरिस प्रॉडक्शन्स