औरंगाबादमध्ये शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या  ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत ग्रामीण भागातील समस्यांचा मागोवा घेणाऱ्या काही ताकदीच्या संहिता व शहरी भागातील संवेदना टिपणाऱ्या एकांकिका सादर झाल्या. पहिल्या दिवशी सोळापैकी ७ एकांकिकांनी स्वामी रामानंदतीर्थ सभागृहात प्रेक्षकांना जिंकून घेतले. रविवारी नऊ एकांकिका सादर होणार आहेत.
औरंगाबादच्या सरस्वती कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने ज्ञानेश्वर लोखंडेलिखित ‘रंग धुंद’, बीड येथील बलभीम महाविद्यालयाची ‘१४ फेब्रुवारी’, देवगिरी महाविद्यालयाची ‘तिच्यासाठी वाट्टेल ते’, जालना येथील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाची ‘एक गाव’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची ‘झाला सोहळा अनुपम’, औरंगाबादच्या सभू कला महाविद्यालयाची  ‘काळगर्भ’ आणि औरंगाबाद येथील अमोल जाधव लिखित ‘सारेगम’ या एकांकिका सादर करण्यात आल्या.
रत्नागिरी केंद्रावर गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची (रत्नागिरी) ‘हिय्या’, बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची (महाड) ‘राजा’, डीबीजे महाविद्यालयाची (चिपळूण) ‘कबूल है’ आणि चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाची (सांगली) ‘एका रात्रीच्या गर्भातील गोष्ट’ या एकांकिकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झाली.
‘लोकांकिका’मुळे नवीन कलाकारांना अभिजात कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. यातूनच नवीन कलाकार तयार होणार आहेत, असे सॉफ्ट कॉर्नरचे व्यवस्थापकीय संचालक डी. एस. कुलकर्णी यांनी सांगितले.
तुम्हाला लोकांकिकाच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर झळकण्याची संधी मिळणार आहे. तुमच्या ग्रुपमधल्या कुणाच्याही ट्विटर हँडलवरून तुमच्या एकांकिकेबद्दल ट्विट करायचे आहे. त्यामध्ये तुमच्या संपूर्ण ग्रुपचा अथवा तालिम करतानाचा फोटोही टाकू शकता. मात्र ट्विट करताना त्यामध्ये #LoksattaLokankika हे हँशटँग आणि @LoksattaLive हे ट्विटर हँडल नमूद करायला विसरू नका. त्यानंतर वरील ट्विट ताबडतोब लोकांकिकाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. स्पध्रेची माहिती, फोटो आणि व्हिडिओ  indianexpress-loksatta.go-vip.net/lokankika वर उपलब्ध.

Story img Loader