महाविद्यालयीन युवकांच्या कलेला नवे व्यासपीठ देणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पध्रेच्या रत्नागिरी विभागीय फेरीत डीबीजे महाविद्यालयाच्या ‘कबूल है’ या एकांकिकेने बाजी मारली. ही एकांकिका आता मुंबईत होणाऱ्या ‘लोकांकिका’च्या महाअंतिम फेरीत जाणार आहे. विभागीय फेरीत बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची ‘राजा’ आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘हिय्या’ या एकांकिकांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने आयोजित या एकांकिका स्पध्रेची रत्नागिरी केंद्राची विभागीय अंतिम फेरी बुधवारी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहात पार पडली. अस्तित्व संस्थेचे सहकार्य आणि ‘झी मराठी’चे माध्यम प्रायोजकत्व मिळालेल्या लोकांकिकेच्या महाअंतिम फेरीत धडक मारण्यासाठी सर्वच स्पर्धक महाविद्यालयांच्या कलाकारांनी चांगले सादरीकरण केले. त्यापैकी ‘हिय्या’ व ‘कबूल है’ या एकांकिकांची समूहनाटय़ाच्या अंगाने मांडणी करण्यात आली होती, तर ‘राजा’ आणि चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाची (सांगली) ‘एका रात्रीच्या गर्भातील गोष्ट’ या एकांकिकांमध्ये प्रत्येकी दोनच पात्रांनी प्रभावी संवाद व अभिनयाच्या जोरावर छाप पाडण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी अखेर ‘कबूल है’ ने बाजी मारली.
विभागीय अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून प्रसिध्द नाटय़-पटकथा लेखक अभिराम भडकमकर, अनिल दांडेकर आणि आप्पा रणपिसे यांनी काम पाहिले.
वैयक्तिक पारितोषिके
*सवोत्कृष्ठ अभिनय: तुषार आठवले (राजा) व गौरी फणसे (कबूल है)
*दिग्दर्शन: मयुर साळवी (राजा)
*नेपथ्य : रोशन ठिक (हिय्या)
*लेखन :  ओंकार भोजने (कबूल है)
*संगीत : रोहन शृंगारपुरे (कबूल है)
*प्रकाश योजना : स्वानंद देसाई, मधुरा अवसरे (हिय्या)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा