महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सळसळत्या उत्साहात सुरू झालेल्या ‘लोकसत्ता-लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पर्धेची नाशिक विभागीय अंतिम फेरी सोमवारी दुपारी चार वाजता येथील महाकवी कालिदास कलामंदिरात रंगणार आहे. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेला अस्तित्व संस्थेचे सहकार्य आणि झी मराठीचे माध्यम प्रायोजकत्व लाभले आहे.
नाशिक केंद्रावर मागील आठवडय़ात प्राथमिक फेरीतून विभागीय अंतिम फेरीसाठी पाच एकांकिकांची निवड झाली. विशेष म्हणजे, स्पर्धेत शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागातील महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. विषयांचे वेगळेपण, तरुणाईमधील जोश, रंगमंचावर स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी कलाकारांनी घेतलेली मेहेनत हे या स्पर्धेचे वैशिष्ठय़ ठरले. प्राथमिक फेरीतून नाशिक विभागीय फेरीसाठी पाठवण (हं.प्रा.ठा. महाविद्यालय), इटर्नल ट्रथ (न. ब. ठाकूर विधी महाविद्यालय, नाशिक), खरा जाणता राजा (दांडेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सिन्नर), हे राम (क. का. वाघ परफॉर्मिग आर्ट्स महाविद्यालय, नाशिक), तहान (हिरे महाविद्यालय, पंचवटी) यांची निवड झाली आहे. महाकवी कालिदास कलामंदिरात सोमवारी विभागीय अंतिम फेरी होईल. या फेरीतून राज्यस्तरीय फेरीसाठी एका एकांकिकेची निवड करण्यात येणार आहे.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
अंतिम फेरीला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या रसिकांनी ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध होणारे कूपन सादर करावे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा