रत्नागिरीतील प्राथमिक फेरीतून ११ जणांची निवड
‘लोकसत्ता’तर्फे आयोजित ‘वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पध्रेअंतर्गत रविवारी येथे पार पडलेल्या रत्नागिरी विभागाच्या प्राथ्मिक फेरीत सहभागी झालेल्या स्पर्धकांना राजकारणाचे वावडे असल्याचे प्रकर्षांने जाणवले.
येथील रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या या स्पध्रेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि गोवा राज्यातील २९ स्पर्धकांनी भाग घेतला. राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रांशी निगडित पाच विषय स्पध्रेसाठी देण्यात आले होते. बहुसंख्य स्पर्धकांनी त्यापैकी ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ किंवा ‘धर्म आणि दहशतवाद’ या विषयांवर जोरदार भाषणे केली, पण सध्याच्या राष्ट्रीय राजकारणाशी थेट संबंध असलेल्या ‘नमो नीती’ या विषयाला एकाही स्पर्धकाने प्रतिसाद दिला नाही.
ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर आणि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सचिव दाक्षायणी बोपर्डीकर यांनी या फेरीचे परीक्षक म्हणून काम पाहिले. जनता सहकारी बँक, पुणे आणि ‘तन्वी हर्बल’ प्रायोजक असलेल्या या स्पध्रेसाठी सिंहगड इन्स्टिटय़ूट, मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस, इंडियन ऑइल, इन्स्टिटय़ूट ऑफ करियर डेव्हलपमेंट (आयसीडी) यांचेही सहकार्य लाभले आहे. तसेच युनिक अ‍ॅकॅडमी आणि स्टडी सर्कल या स्पध्रेसाठी नॉलेज पार्टनर आहेत. या प्राथमिक फेरीत गुणानुक्रमे शेवटच्या दोन स्पर्धकांना समान गुण पडल्याने विभागीय अंतिम फेरीसाठी १० ऐवजी ११ जणांची निवड करण्यात आली.
ही फेरी येत्या ५ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे. स्पध्रेची अंतिम महाफेरी १४ फेब्रुवारी रोजी मुंबईत रंगणार आहे.
प्राथमिक फेरीतील विजेते –
संपदा आंब्रे (एसबीके लॉ कॉलेज, रत्नागिरी), श्रुती भिंगार्डे (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांजा), सुमेधा जोशी (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी), आशीष आठवले (एसबीके लॉ कॉलेज, रत्नागिरी), शुभम बुकटे (जे जे मगदूम महाविद्यालय, जयसिंगपूर), हृषीकेश डाळे (फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी, रत्नागिरी), अथर्व सोमण (वराडकर-बेलोसे महाविद्यालय, दापोली), शुभम जाघव (गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी), श्वेता महाजन (रवी नाईक कनिष्ठ महाविद्यालय, फोंडा, गोवा), सोनाली आठल्ये (आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरूख) आणि शंकर काळसेकर (डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा, ता. मालवण)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा