पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीकास्त्र सोडले आहे. मी आजवर क्रिकेट सामने फिक्स असल्याचे ऐकले होते, पण हल्ली मुलाखतीही फिक्स असतात, अशा शब्दात त्यांनी या मुलाखतीवर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली असून ९५ मिनिटांच्या या मुलाखतीमध्ये त्यांनी राम मंदिर, रिझर्व्ह बँकेचा वाद, जमावाकडून होणाऱ्या हत्या आदी मुद्द्यांवर भाष्य केले. या मुलाखतीवरुन जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन टीकास्त्र सोडले. या ट्विटबरोबरच त्यांनी फेसबुकवरूनही एक व्हिडिओ शेअर करत मुलाखतीवर भाष्य केले. ‘गेल्या साडेचार वर्षात एकही मुलाखत न देता ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेली ‘फिक्स’ मुलाखत मोदींच्या मानसिक पराभवाचे द्योतक आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, देशातील मुख्य प्रश्न व समस्यांचा यथायोग्य उहापोह न करू शकणारी ही आदर्श मुलाखत होती, असे त्यांनी म्हटले आहे. याच संदर्भात लोकसत्ता ऑनलाइनने एक पोल घेतला आहे. तुम्हीही फेसबुक आणि ट्विटवर यासंदर्भात आपले मत नोंदवू शकता.

आपल्या ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात, ‘लहानपणी एक मुलगा बॅट- बॉल घेऊन यायचा आणि आम्हाला क्रिकेट खेळायला लावायचा. त्याला आवडेल त्याला बॉलींग करायला लावायचा. बॅटींग मात्र तो स्वतःच करायचा. बॉल जोरात टाकला तरी ओरडायचा’. तसेच फेसबुक पेजवरील व्हिडीओमध्ये मोदी सर्वधर्म समभाव म्हणतात, पण गुजरात दंगलीतील मुस्लिमांच्या हत्येबाबत ते काहीच बोलत नाही. राफेल कराराबाबतही त्यांनी भाष्य करणे टाळले, याकडेही आव्हाड यांनी लक्ष वेधले.

Story img Loader