बुलेट ट्रेनमुळे महाराष्ट्राची आर्थिक भरभराट होईल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी मुंबईमधील एका कार्यक्रमात बोलताना केला. एबीपी माझा वृत्तवाहिनीवरील ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात बोलताना त्यांनी बुलेट ट्रेनला होणारा विरोधही खोडून काढताना हा दावा केला. मात्र जनतेला फडणवीसांचा हा दावा पटलेला दिसत नाही. म्हणूनच ‘लोकसत्ता डॉट कॉम’ने घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये ७० टक्क्यांहून जास्त लोकांनी बुलेट ट्रेनमुळे महाराष्ट्राचा आर्थिक विकास होणार नाही असे स्पष्ट मत नोंदवले आहे. फेसबुक व ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर घेण्यात आलेल्या जनमत चाचणीमध्ये तीन हजार ६०० हून अधिक जणांनी आपले मत नोंदवले आहे.
बुलेट ट्रेनमुळे महाराष्ट्राची आर्थिक विकास होईल असा दावा करताना फडणवीस यांनी विमातळांचे उदाहरण दिले. जेव्हा देशात एअरपोर्ट बांधण्याचा निर्णय झाला तेव्हा देशात एक टक्के लोकही विमान प्रवास करत नव्हते. पण पंधरा हजार कोटी रुपये खर्चून एअरपोर्ट बांधण्यात आले. त्यामुळे हवाई मार्गाने आपण जोडले गेलो. रोजगाराच्या संधी वाढल्या. तेच बुलेट ट्रेनच्या बाबतीत होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला होता. मात्र मराठी जनतेला फडणवीस यांचा हा विश्वास योग्य असल्याचे वाटत नाही. म्हणूनच ‘बुलेट ट्रेनमुळे महाराष्ट्राचा आर्थिक विकास होईल हा देवेंद्र फडणवीस यांचा दावा पटतो का?’ या प्रश्नाला ७० टक्क्यांहून अधिक लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे.
फेसबुकवर २४ तासांमध्ये या जनमत चाचणीत २ हजार ७०० हून अधिक जणांनी आपले मत नोंदवले. त्यापैकी १ हजार ८०० म्हणजेच ७० टक्क्यांहून अधिक लोकांनी फेसबुकवरील जनमत चाचणीत बुलेट ट्रेनमुळे महाराष्ट्राचा आर्थिक विकास होईल असे वाटत ‘नाही’ असे मत नोंदवले. तर ७८६ जणांनी बुलेट ट्रेनमुळे महाराष्ट्राचा आर्थिक विकास होईल या देवेंद्र फडणवीसांच्या मताशी आपण सहमत असल्याचे सांगितले आहे.
तर हाच प्रश्न ट्विटरवर विचारण्यात आला असता ७३ टक्के लोकांनी फडणवीसांच्या मताच्या विरुद्ध मत नोंदवले. तर २७ टक्के लोकांनी फडणवीसांचे मत योग्य असल्याचे सांगत ‘होय’ असे उत्तर दिले.
#LoksattaPoll:
बुलेट ट्रेनमुळे महाराष्ट्राचा आर्थिक विकास होईल हा देवेंद्र फडणवीस यांचा दावा पटतो का?— LoksattaLive (@LoksattaLive) October 31, 2018
एकंदरीतच राज्यातील फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार या बुलेट ट्रेनमुळे दोन्ही राज्यांच्या फायदा होईल असे सांगत असले तरी जनतेला तसे वाटत नसल्याचेच या जनमत चाचणीतून स्पष्ट झाले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी तसेच विविध राजकीय पक्षांनीही वेळोवेळी विरोध केला आहे. त्यातच या जनमत चाचणीतून सामान्यांचाही बुलेट ट्रेनला असणारा विरोध स्पष्टपणे दिसत आहे.
काय म्हणाले होते फडणवीस:
‘बुलेट ट्रेनमुळे चीनचाही विकास झाला’
बुलेट ट्रेनमुळे चीनचाही विकास झाल्याचे सांगतानाच फडणवीस यांनी बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचे समर्थन केले होते. बुलेट ट्रेनसाठी १ लाख कोटीची गुंतवणूक जपान करणार आहे. त्यासाठी जपान ५० वर्षांसाठी कर्ज देणार आहे. महत्वाच म्हणजे या करारात तंत्रज्ञान हस्तांतरण आहे. बुलेट ट्रेन बांधणीसाठी सिमेंट, लोखंडाची गरज लागणार. रेल्वे कोचेस बनवले जाणार त्यामुळे कितीतरी मोठया प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. देशात रोजगारासाठी गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला बँकांमार्फत निधीची व्यवस्था करावी लागते पण बुलेट ट्रेनमुळे सहज भांडवल उपलब्ध होतेय असे ते म्हणाले. त्यामुळे बुलेट ट्रेनमुळे आर्थिक विकासच होईल असा दावा त्यांनी केला. चीनचा विकासही बुलेट ट्रेन आल्यानंतरच झाला. बुलेट ट्रेन येण्याआधी चीनचा जीडीपी भारतापेक्षा कमी होता असे फडणवीस यांनी सांगितले.
‘मनमोहन सिंग सरकारच्या काळात मार्गनिश्चिती’
बुलेट ट्रेनसाठी मुंबई-अहमदाबाद मार्गाची निवड का केली? असा प्रश्न विरोधक विचारतात त्यावर फडणवीस म्हणाले कि, बुलेट ट्रेनचा हा मार्ग आधीच्या मनमोहन सिंग सरकारच्या काळात निश्चित झाला होता असे सांगितले.