देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलेलं असतानाच दुसरीकडे याच विषयावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपांचीही लाट आल्याचं मागील काही आठवड्यांपासून पहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्येही करोना चाचण्या, ऑक्सिजन, औषधं, तौते वादळ या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपामध्ये कलगीतुरा रंगल्याचं चित्र दिसत आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या कारभारावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस टीका करताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांपासून ते करोना परिस्थितीसंदर्भात अनेक विषयांवरुन फडणवीस मागील काही काळापासून राज्य सरकारवर टीका करत आहे. त्यातच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही या टीकेला उत्तर देत आहेत.
नक्की वाचा >> उद्धव ठाकरेच Best CM! करोनाची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती
विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे समर्थक देवेंद्र फडणवीसच कसे चांगले मुख्यमंत्री होते व उद्धव ठाकरे अयशस्वी ठरल्याचा दावा करताना दिसत आहेत, तर शिवसेना समर्थक उद्धव ठाकरेंनी करोनाची परिस्थिती अत्यंत कुशलतेने हाताळल्याचा दाखला देत तेच जास्त सक्षम मुख्यमंत्री असल्याचे सांगत आहेत. समाजमाध्यमांमध्ये रंगत असलेल्या या चर्चांच्या आणि माजी मुख्यमंत्र्यांकडून सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर लोकसत्ता डॉट कॉमने जनमत जाणून घेण्यासाठी ट्विटरवर एक पोल घेतला. या सर्वेक्षणामध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती द्याल असा प्रश्न विचारण्यात आला होता. २४ तासांच्या या सर्वेक्षणामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये टफ फाइट दिसून आली. या पोलमध्ये चार लाखांहून अधिक जणांनी आपलं मत नोंदवलं. ट्विटरमधल्या पोलवर मिळणाऱ्या प्रतिसादाचा विचार केला तर चार लाखांपेक्षा जास्त जणांनी सहभाग घेणं हा एक विक्रमच म्हटला पाहिजे. या पोलमध्ये अत्यंत चुरस दिसून आली, कधी फडणवीसांचे तर कधी ठाकरेंचे पारडे जड होताना दिसले. काही वेळा तर पोलचा तराजू ५० टक्क्यांच्या आसपास रेंगाळलेलाही दिसला व हा सामना टाय होतो की काय असा प्रश्नही पडला. परंतु अंतिम निकाल बघता या पोलमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारल्याचं चित्र दिसत आहे.
लोकसत्ता डॉट कॉमच्या या पोलमध्ये फडणवीस यांना ५२.८ टक्के मतं मिळाली आहेत. तर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ४७.२ टक्के मतं मिळाली आहेत. म्हणजेच फडणवीस यांना एकूण पाच लाख २९ हजार २४९ मतांपैकी दोन लाख ७९ हजार ४४३ मतं पडली तर उद्धव यांना दोन लाख ४९ हजार ८०६ जणांनी समर्थन दर्शवलं. म्हणजेच फडणवीस यांना उद्धव यांच्यापेक्षा २९ हजार ६३७ मतं अधिक मिळाली.
जनमत चाचणी सर्वसामान्य वाचकांसाठी घेण्यात आलेली होती, परंतु आपल्या नेत्याला जास्तीत जास्त मिळावीत यासाठी कार्यकर्ते व नेत्यांना पोलमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांनी केल्याचं जाणवलं. विशेष करुन भाजपाच्या राज्यातील आमदारांपासून दिल्लीतील तेजेंदर पाल बग्गासारख्या सोशल नेटवर्किंगवर लाखोंच्या संख्येने फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांनीही या पोलमध्ये देवेंद्रजींना मतदान करा असं म्हणत हे ट्विट शेअर केलं होतं. घाटकोपरचे आमदार राम कदम, आमदार मंगेश चव्हाण, डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण, आमदार गपणत गायकवाड यासारख्या भाजपाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हा पोल शेअर केला होता. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनीही हा पोल शेअर केला होता.
विशेष म्हणजे भाजपाविरोधात भूमिका घेणाऱ्या रिचा चढ्ढासारख्या अभिनेत्रीनेही या पोलमध्ये आपलं मत नोंदवलं. तिने शिवसेनेच्या बाजूने मत देत धनुष्यबाणाचा इमोन्जी पोस्ट करत हा पोल शेअर केला.
लोकसत्ता डॉटकॉमच्या या पोलची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत झाल्याची पहायला मिळाली.