फासेपारधी मुलांच्या शिक्षणासाठी मतीन भोसले या तरुणाचा आटापिटा
केवळ मानवी शरीर लाभून उपयोगाचे नाही, तर माणसाचे जगणेही आपल्याला जगता यायला हवे, असा संदेश अंधकारात खितपत पडलेल्या फासेपारधी लोकांना देत मतीन भोसले यांच्या आदिवासी फासेपारधी सुधार समितीने अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे भटक्या मुलांसाठी प्रश्नचिन्ह ही निवासी आश्रमशाळा सुरू केली आहे. या आश्रमशाळेमुळे फासेपारधी विद्यार्थ्यांच्या जीवनात किमान थोडा तरी फरक पडला आहे. सध्या या शाळेत एकूण ४४७ विद्यार्थी शिकत आहेत.
सर्वकार्येषु सर्वदा : ‘प्रश्नचिन्ह’ नव्हे, प्रश्नांचे उत्तर!
अनेक मुलांचे वडील तुरुंगात आहेत. अनेक पालकांची आपल्या मुलांना शिकवण्याची ऐपतच नाही. काही मुलं अनाथ आहेत. सिग्नलवर, रेल्वे स्थानकार भीक मागणाऱ्या या मुलांना गोळा करून मतीन भोसले यांनी त्यांची शाळा भरवली आहे. त्यांच्या भोजन आणि निवासाच्या व्यवस्थेसाठी अजूनही मतीन भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे. अल्पशा मानधनावर येथील शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. मतीन भोसले यांना या कामासाठी जशी शासनाची मदत मिळत नाही, तशीच शाळेत आणलेल्या मुलांच्या आईवडिलांचीदेखील मिळत नाही. कारण, अनेकांना हीच मुले रोजीरोटी मिळवून देणारी आहेत, पण समाजाला गर्तेतून बाहेर काढण्यासाठी मतीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘मिशन’ हाती घेतले आहे. शिक्षणापासून दूर असलेल्या मुलांना घेऊन मतीन त्यांच्यामध्ये किमान सुसंस्कारित माणूस घडवण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक संस्था या शाळेसाठी मदत करीत आहेत, पण अजूनही मदतीची गरज आहेच.