शिर्डी हे धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने शहरात यापुढे मोर्चास बंदी घातली पाहिजे यासाठी प्रशासनास विनंती करणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.
शिर्डीत काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाला हिंसक वळण लागले होते. आंदोलकांनी या मोर्चा दरम्यान काही दुकानांची मोडतोड करून गोंधळ घातला. राधाकृष्ण विखे, युवा नेते डॉ. सुजय विखे यांनी या परिसराची पाहणी केली. नंतर राधाकृष्ण विखे पत्रकारांशी बोलत होते. नगराध्यक्ष कैलास कोते, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ताराचंद कोते, शिर्डी शहर कॉग्रेस अध्यक्ष रतिलाल लोढा आदी यावेळी उपस्थित होते.
विखे म्हणाले, आक्रोश मोर्चाच्या नावाखाली समाजाचा वापर करून दहशत निर्माण करण्याचा आणि राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार लांछनास्पद आहे. दुकान, हॉटेलांची तोडफोड, साईभक्तांना मारहाण व प्रक्षोभक भाषणे करुन जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. ग्रामस्थांनी गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही, अशी भूमिका घेतली तर अशा घटना घडणार नाहीत. गुन्हेगारी बाबतीत ग्रामस्थांनीच विचार केला पाहिजे. दुकाने, बाजारपेठेत नुकसान घडवून आणले जाते, याचे समर्थन कोणीही करणार नाही. सागर शेजवळ खून प्रकरणी शिर्डी पोलिसांनी सर्व आरोपीना अटक केली, जवखेडा प्रकरणात कोणत्या आरोपींना अटक झाली हे सर्वज्ञात आहे. खर्डा प्रकरण वेगळी घटना आहे तसेच सोनई येथील घटनेबाबतही प्रशासनाने योग्य ती कारवाई केली आहे. यातील आरोपींना कोणीही पाठीशी घालणार नाही. मात्र नगर जिल्हा दलित अत्याचारग्रस्त म्हणून घोषित करण्याची मागणी सर्वथा चुकीची आहे. यामागे राजकारण आहे, असा आरोपही विखे यांनी केला.
आक्रोश मोर्चास दलित नेत्यांचा पाठिंबा नव्हता. श्री साईबांबाबद्दल अनुउद्गार काढून भाविकांच्या भावनेला हात घातला गेला. मूठभर लोक अघोरी कृत्य करुन गावाला वेठीस धरुन जातीय तणाव भडकविण्याचा प्रयत्न करीत आहे. शिर्डी धार्मिक ठिकाण असल्याने या ठिकाणी यापुढे मोर्चास बंदी घालावी अशी विनंती प्रशासनास करणार आहे. तसेच छत्रपती कॉम्प्लेक्सच्या प्रांगणात भाविकांची गर्दी असते. या ठिकाणी कोणत्याही सभेस परवानगी देऊ नये असा ठराव नगरपंचायतीने करावा. सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी चालू असून अशा घटना प्रशासनाने पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा