सोलापूर : महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापोटी मिळालेल्या पैशावर घरात पतीराजाचा अधिकार राहात असून त्यातून परस्पर खर्च केल्याबद्दल विचारणा करण्याची सोयही लाडक्या बहिणींना राहिली नसल्याचे प्रकार घडत आहेत. माढा तालुक्यातील लोणी गावात लाडक्या बहिणीच्या पैशांवरून एका लाभार्थी विवाहितेवर पती व सासूने मिळून सशस्त्र हल्ला केल्याची घटना घडली.

यासंदर्भात जखमी लाडकी बहीण निशा धनाजी लोंढे (वय २८) हिने कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या पतीसह सासूविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. निशा हिच्यावर कोयता आणि लाकडाने हल्ला झाला आहे. तिच्यावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

निशा लोंढे हिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो. गेल्या फेब्रुवारी व चालू मार्च महिन्याचे हक्काचे पैसे मिळाले खरे; परंतु हे सर्व पैसे पतीने घेऊन परस्पर खर्चही करून टाकले. त्यामुळे नाराज झालेल्या निशा हिने पतीला विचारणा केली. त्यावरून भांडण झाले. यात सासूने मुलांची बाजू घेऊन सून निशा हिला शिवीगाळ करून धमकावले. त्याचवेळी पतीने लाकडी दांडक्याने पत्नीच्या पाठीवर आणि मांडीवर मारहाण केली. नंतर हातात कोयता घेऊन तिच्या पायावर, गुडघे आणि हातावर हल्ला केला. या गुन्ह्याची नोंद झाली असली तरीही पती व सासूला लगेच अटक झाली नाही.

पैसे काढू दिले नाही म्हणून…

दरम्यान अन्य एका घटनेत महिला बचत गटातून पैसे काढून दिले नाहीत म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीवर लोखंडी झारीने हल्ला केला. अक्कलकोटमध्ये ही घटना घडली. मोनाली परशुराम भोकरे (वय २९) असे जखमी विवाहितेचे नाव आहे. तिने आपल्या पतीला यापूर्वीही बचत गटातून पैसे काढून दिले होते. परंतु हे पैसे बाहेर खर्च केल्यानंतर पतीने पुन्हा पैसे मागितले. तेव्हा पत्नी मोनाली हिने माझ्याकडे पैसे नाहीत. याअगोदर बचत गटातून काढून तुम्हाला दिलेले पैसे तुम्ही बाहेर खर्च केले. आता पुन्हा कोठून पैसे देऊ, अशी समजूत घातली असता संतापलेल्या पतीने तिच्या सर्वांगावर लोखंडी झारीने मारून जखमी केल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे

Story img Loader