माध्यमिक शिक्षक पतसंस्थेतील सत्ताधारी सभासदांची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप करीत विरोधी परिवर्तन मंडळाने सत्ताधारी संचालकांचा निषेध करण्यासाठी संस्थेच्या नगर शहरातील मुख्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन केले. या लुटीचा जाब सभासद येत्या सर्वसाधारण सभेत विचारणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
परिवर्तन मंडळाचे संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, बाळासाहेब राजळे, चांगदेव खेमनर, शैला जगताप यांच्यासह पदाधिकारी सुनील पंडित, सुभाष कडलग, मारुती लांडगे, भीमराव खोसे, सुनील जगताप, अजिनाथ नेटके, विकास मोरे, अनिल आचार्य, सचिन गावडे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
सत्ताधाऱ्यांनी केवळ निवडणूक वर्ष असल्याने सभासदांना १४ टक्के लाभांश दिला. संस्थेची १०० टक्के वसुली असतानाही यंदा मात्र १२ टक्के लाभांश देऊन सभासदांचा खिसा मारला जात आहे. यंदा झालेला नफा पाहता किमान १५ टक्के लाभांश देण्याची आवश्यकता आहे. परंतु संस्थेत अनावश्यक बाबींवर लाखो रुपयांचा खर्च होत आहे. जामीन कर्ज मर्यादाही किमान ८ लाख रु. करण्याची गरज आहे. ठेवीवरील व्याज वाढवण्याची आवश्यकता आहे. परंतु संस्था ऑनलाईन करण्याच्या नावाखाली सत्ताधारी लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहेत. सत्ताधाऱ्यांचा कारभार संस्थेला आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आणणारा ठरत आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

Story img Loader