नगर महानगरपालिकेच्या तसेच भिंगार छावणी मंडळाच्या नाक्यांवर मोटारचालकांची लूट होत असून परराज्यातील वाहनचालकांवर होणारा अन्याय दूर करण्याची मागणी राजस्थानमधील एका वाहनचालकाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची शनिवारी राळेगणसिद्घीत भेट घेऊन केली.
भिंगार छावणी मंडळाच्या नाक्यावर प्रत्येक वाहनासाठी १५ रूपये कर आहे. प्रत्यक्षात २०० रूपयांची बळजबरीने आकारणी करण्यात येते. या नाक्यावर पंधरा रूपयांच्या एकूण बारा व दहा रूपयांच्या दोन पावत्या दिल्या जातात. एकूण चौदा पावत्यांपैकी एक पावती वगळता उर्वरित पावत्या बनावट असल्याचा दावा या मोटारमालकाने केला. संबंधित पावत्या त्याने हजारे यांच्याकडे सुपूर्द केल्या.
नगर महानगरपालिकेच्या नाक्यावर प्रत्येक वाहनासाठी शंभर रूपये पारगमन कर आहे. या नाक्यावर शंभर रूपयांची पावती दिली जाते. प्रत्यक्षात मात्र २५० रूपयांची आकारणी केली जाते. याबाबत एखादया मोटार चालकाने विचारणा केल्यास त्याला दमदाटी केली जाते. पैसे देण्यास नकार दिल्यास बेदम मारहाणही केली जाते.
राजस्थान, हरीयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश आदी राज्यांतून येणारी मालवाहू वाहने भिंगार तसेच नगर शहरातून जातात. ही वाहने दोन्ही नाक्यांवर थांबविण्यात येउन पठाणी वसुली केली जाते. नियमाप्रमाणे कर देण्यास चालकांची कोणतीही हरकत नाही. दररोज या नाक्यांवरून परराज्यातील सुमारे ३ हजार वाहने जातात. प्रत्येक वाहनामागे वसूल करण्यात येणाऱ्या जास्तीच्या रकमेचा विचार केल्यास एवढी मोठी रक्कम कोणाच्या घशात जाते याचाही पर्दाफाश झाला पाहिजे अशी आग्रही मागणी या वाहनमालकाने केली.
नाक्यांवर होत असलेल्या लूट व मारहाणीसंदर्भात नगर शहरातील पोलिसांकडेही वारंवार तक्रारी केल्या परंतू पोलिस प्रशासनाशीही नाक्यांवरील कर्मचाऱ्यांचे साटेलोटे असल्याने पोलिसांकडूनही दमदाटी करण्यात आल्याचा अनुभव असल्याचे सांगण्यात आले.
हजारे यांनी देशभर भ्रष्ट्राचाराविरोधात रणशिंग फुंकले आहे. त्यांच्याच जिल्हयात परप्रांतीय वाहनचालकांची लूट होत असल्याने त्यांना वस्तुस्थिती सांगण्यासाठी आपण नगर ते पुणे रस्त्यावर वाहन थांबवून राळेंगणसिद्घीत हजारे यांची भेट घेण्यासाठी आल्याचे या वाहनमालकाने सांगितले.

Story img Loader