वक्फ बोर्डाला दहा कोटींचा निधी दिल्याचा प्रश्न सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री केतकी चितळेने व्हिडीओद्वारे या मुद्द्यावर टीका केल्यानंतर विश्व हिंदू परिषदेनेही निधी देण्यास विरोध केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधत असताना विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. यावेळी पत्रकारांनी वक्फबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भाजपावर सामाजिक ध्रुवीकरणाचा आरोप केला. मुस्लीम समाजाला सरकारने काही दिले असेल तर त्यावर आकांडतांडव करण्याची गरज नाही. सरकारने रामदेव बाबा यांच्या कंपनीला एक रुपया दराने हजारो एकर जमीन दिली आहे. त्यावर कुणी बोलत नाही. मात्र इतर प्रश्नांवर बोलून जातीय आग पसरविण्याचा प्रकार होत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र साप्ताहिक ऑर्गनाझरमध्ये छापून आलेल्या लेखात अजित पवारांना भाजपामध्ये घेतल्यावरून टीका करण्यात आली आहे. यावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “ऑर्गनायझरच्या लेखातून जे म्हटले गेले, त्यातून जर बोध घेतला गेला, तर भाजपा काही शिकतेय, असे दिसेल. लोकसभा निवडणुकीचं देशातील चित्र पाहिलं तर ७९ जागावर एक लाखांपेक्षा कमी मतांनी भाजपाचा विजय झाला आहे. याचाच अर्थ नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला देशातील जनतेने स्पष्टपणे नाकारले आहे. याच जागांवर काही हजार मतांनी इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला असता तर सत्ता आमची आली असती.
“…म्हणून त्या अपेक्षा बर्याचदा फोल ठरतात”, किरण मानेंची आदित्य ठाकरेंसाठी खास पोस्ट
महाराष्ट्रात जर या निवडणुकांच्या नंतर सर्व्हे केला तर भाजपाची खरी परिस्थिती समजून येईल. महाविकास आघाडीला आता कुणीही पराभूत करू शकत नाही, ही आघाडी भक्कम आहे, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
तर भुजबळांनी विधानसभेत धडा शिकवावा
छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेतून माघार घेण्यासंदर्भात नुकतेच एक विधान केले. माझा अपमान झाल्यामुळे मी उमेदवारीपासून माघार घेण्याचा निर्णय घेतला, अशी खंत भुजबळांनी व्यक्त केली. त्यावर बोलत असताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, छगन भुजबळांचा कुणी अपमान केला असेल तर त्यांनी त्याचा सूड विधानसभा निवडणुकीत घ्यावा. ज्यांनी भुजबळांचा अपमान केला त्यांच्याविरोधात बंड पुकारून भुजबळांनी आपले बळ दाखवावे, असे आव्हान वडेट्टीवार यांनी दिले.
हिंदू भाजपाबरोबर नाही, हे स्पष्ट झाले
मुंबईत उबाठा आणि मविआला मुस्लीमांची मते मिळाली म्हणून त्यांचा विजय झाला, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले की, याचा अर्थ हिंदूंनीही भाजपाला मतदान केले नाही. ज्या ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचा वास होता, त्या त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला. अयोध्येतही भाजपाचा पराभव झाला. तिथेही हिंदूंची मते त्यांना मिळाली नाहीत, असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला.