२२ जानेवारी हा दिवस जवळ येतो आहे तशी या दिवसाची उत्सुकता वाढली आहे. कारण या दिवशी अयोध्येतल्या रामाच्या मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. इतकंच नाही तर एका ५१ इंची मूर्तीचीही प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. ही मूर्ती शिल्पकार अरूण योगीराज यांनी घडवली आहे. देशात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह शिगेला पोहचला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खास गाणं त्यांच्या X अकाऊंटवरुन शेअर केलं आहे.
काय आहे देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट?
श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या शुभ प्रसंगी, संगीतकार सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेले व कवी संदीप खरे यांनी लिहिलेले ‘हृदय में श्रीराम है’ हे भक्ती गीत अतिशय हृदयस्पर्शी आहे. सुप्रसिद्ध गायक पद्मश्री सुरेश वाडकर आणि गायिका आर्या आंबेकर यांनी गायलेले गीत अत्यंत भक्तिमय असून ते ऐकताना एक सुखद अनुभव येतो.
संपूर्ण टीम ला माझा जय श्रीराम
सर्वांनी जरूर ऐकावे.. अशी पोस्ट लिहून देवेंद्र फडणवीस यांनी या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या गाण्याचे बोल ऐकून अंगावर रोमांच उभे राहतात यात काही शंकाच नाही.
जय श्रीराम या घोषणा देत क्रेनच्या मदतीने रामाची मूर्ती आज मंदिरात नेण्यात आली. मंदिरात मूर्ती ठेवण्यापूर्वी विधीवत पूजा करण्यात आली. जी मूर्ती रामाच्या मंदिरात आणण्यात आली ती शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली मूर्ती आहे.
काय आहेत रामाच्या मूर्तीची वैशिष्ट्ये?
गाभाऱ्यात ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे ती सावळ्या रंगाची आहे आणि ही मूर्ती म्हणजे रामाचं बालरुप आहे.
५ वर्षांच्या रामाची ही मूर्ती आहे जी गाभाऱ्यात बसवली जाईल आणि त्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ तारखेला पार पडणार आहे.
शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेली ही रामाची मूर्ती ५१ इंची आहे. या मूर्तीचं वजन २०० किलो आहे.
गाभाऱ्यात ही मूर्ती ठेवण्यात येणार आहे आणि २२ जानेवारी या दिवशी दुपारी १२.२० या वेळी प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु होईल जो दुपारी १ वाजपेर्यंत चालण्याची शक्यता आहे.
रामलल्लाची मूर्ती ५१ इंची का?
रामलल्लाची मूर्ती ५१ इंची उंचीची ठेवण्यात आली आहे. कारण भारतात सर्वसाधारणपणे पाच वर्षांच्या मुलाची उंची ही तितकीच असते. तसंच ५१ हा शुभ अंक मानला गेला आहे. त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करुन स्थापन करण्यात येणारी मूर्ती ५१ इंची आहे. या मूर्तीची निर्मिती शाळीग्राम या दगडात कोरीव काम करुन करण्यात आली आहे. हिंदू देव-देवतांच्या मूर्ती या खासकरुन शाळीग्राम दगडापासूनच तयार केल्या जातात.
देशात सगळं उत्साहाचं आणि उत्सवाचं वातावरण असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदीप सलील यांचं गाणं पोस्ट केलं आहे. हे गाणं सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकर या दोन्ही गायकांनी म्हटलंं आहे.