शिर्डीजवळील नांदुर्खी येथील बजरंग शॉिपग मॉलला गुरुवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. तीनमजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यास मोठय़ा प्रमाणात आग लागली होती. लहान मुलांचे कपडे, साडय़ा, अन्य कपडे, सौंदर्य प्रसाधने व किराणा माल या आगीत जळून खाक झाला.
साईबाबा संस्थानचे कर्मचारी कामावर जात असताना पहाटे तीनच्या सुमारास मॉलला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या मॉलचे मालक राजेंद्र चौधरी यांचे शेजारीच निवासस्थान आहे. या कर्मचाऱ्यांनी त्यांना आगीची कल्पना दिली. भीषण आग व धुराचे लोळ पाहून आसपासचे नागरिक भयभीत झाले होते. त्यांनी अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. राहाता नगरपालिका, शिर्डी नगरपंचायत व अन्य ठिकाणचे बंब तातडीने घटनास्थळी पोहोचले. मॉलच्या काचा फोडून चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. स्थानिक काही नागरिकांनीही आग विझविण्यासाठी शिकस्तीचे प्रयत्न केले.
या तीनमजली मॉलमधील दुसरा मजल्यातील सर्व माल आगीत जळून खाक झाला. मॉलमध्ये कीड्स वेअर, सूटिंग, शर्टिग, सौंदर्य प्रसाधने, किराणा माल आदींचा कोळसा झाला. सुदैवाने तळमजला तसेच तिसऱ्या मजल्यावर असलेले मिनी थिएटर आगीतून वाचविण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी अशा आशयाची तक्रार मॉलचे मालक राजेंद्र चौधरी यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दिली. शिर्डी पोलिसांनी जळिताचा गुन्हा दाखल केला असून, राहाता महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात ४ कोटी ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा