जिल्ह्य़ाच्या सर्वदूर भागास सोमवारी गारपिटीने झोडपून काढल्याने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हजारो हेक्टरवरील फळबागा व पिकांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेली तीन वर्षे सलग दुष्काळी परिस्थितीला तोंड देणा-या शेतक-याचे या गारपिटीने तर कंबरडेच मोडून निघाले आहे. गेल्या आठवडय़ात काही भागात झालेल्या गारपिटीतील नुकसानीचे पंचनामेही पूर्ण होत नाही, तोच पुन्हा गारपीट झाल्याने शेतक-यांवर अस्मानी आणि सुलतानी संकट कोसळले आहे. राज्यकर्ते आणि प्रशासनही लोकसभा निवडणुकीच्या तयारीत मश्गूल असल्याने दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे.
सोमवारी जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागात वादळी वा-यासह गारपिटीचा अवकाळी पाऊस झाला. नगर शहरात मंगळवारी सायंकाळनंतर पुन्हा पावसास सुरुवात झाली होती. कालच्या गारा लिंबोणीच्या आकारापासून ते लिंबाच्या आकाराएवढय़ा होत्या. रब्बीचा हातातोंडाशी आलेला हरभरा, गहू, ज्वारीचा घास त्याने हिरावला. ज्वारीच्या चा-याचेही अतोनात नुकसान झाले. फळबागांमध्ये लगडलेली द्राक्षे, डाळिंब आदी फळेही झडली. आंब्याचा मोहोर गळून गेला, उसाची पानेच गळून गेल्याने केवळ खोड राहिले आहेत. शेतात पाणी साचल्याने कांदा सडून जाणार आहे, भाजीपाल्याचेही नुकसान प्रचंड आहे. गहू, ज्वारीची प्रतवारीही खराब होणार आहे. वादळाने अनेक ठिकाणची उभी पिके लोळली.
कालचा पाऊस अकोले वगळता सर्वच तालुक्यांत आहे. आठवडाभराच्या कालावधीतच कर्जत, जामखेड, श्रोगोंदे तालुक्यात तिस-यांदा गारपीट झाली आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंद्याचा कोळगाव, घारगाव, पिंपळगाव पिसा, बेलवंडी, पारगाव, विसापूर परिसर, कर्जतमधील थेरवडी, दूरगाव, बारडगाव सुद्रिक, वायिशगे, पिंपळगाव, कळधरण आदी १५ गावांचा परिसर, जामखेड व जवळ्याचा भाग, कोपरगावमधील कारेगाव, सडे, वारी परिसर, राहत्यातील वाकडी, एकरुखे, चोळकेवाडी, शिंगवे, अस्तगाव, लोणीचा परिसर, नगर तालुक्यातील वाळकी, देऊळगाव सिद्धी, उदरमल, पांगरमल, पाथर्डीतील भालगावचा परिसर, शेवगावमधील बोधेगावचा १ हजार १०० हेक्टरचे क्षेत्रासह बालमटाकळी, शेकटे, कानोशी, नागलवाडी, लाडजळगाव, सुकडी, कांबी या गावातील क्षेत्र गारपिटीने ग्रस्त झाले.
संगमनेरमधील आश्वी, तळेगाव, राहुरीतील वांबोरी परिसर, शेवगावमधील दहिगावनेचा भाग या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांमार्फत पंचनामे सुरू आहेत.

Story img Loader