कमालीच्या उष्म्याने हैराण झालेल्या जीवांना अवकाळी पावसाचा दिलासा मिळेल अशी आशा असतानाच, काल सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह टपोऱ्या गारा घेऊन कोसळलेल्या पावसाने अवघा कराड तालुका व नजीकच्या परिसरात पाणीच पाणी केले. मात्र, काही मिनिटेच बरसणे पसंत करून, पावसाने पाठ फिरवल्याने उष्म्याचा पारा चढताच राहिला आहे.
दरम्यान, तालुक्यातील आटके, विंग, कोळे खटाव तालुक्यातील पुसेगाव व अन्य परिसरासह पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावून लाखो रूपयांची हानी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काल ठिकठिकाणी झाडे मोडून पडल्याने कराड-तासगाव मार्ग काहीकाळ ठप्प झाला होता. फांद्या तोडून रस्त्यावरील झाडे काढून हा मार्ग मोकळा करण्यात आला. तर, विजेचा खेळखंडोबा झाल्याने अनेक गावे अंधारात राहिली.
सोमवारी सायंकाळच्या सुमारास ढग दाटून येऊन कोसळलेल्या या पावसाने गजबजलेल्या बाजारपेठा ओस पडल्या. लोकांची एकच धांदल उडाली. विद्यार्थी व चाकरमान्यांना पावसाने गाठले. या पावसात भिजण्याची मजाही अनेकांनी लुटली. मात्र, गारांसह जोरदार बरसलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी उभी पिके झोपल्याचे वृत्त आहे. तर, हातची पिके गेल्याने काही ठिकाणी बळीराजा हवालदिल झाला आहे. ऊसतोडणीमध्येही व्यत्यय आला. परिणामी ऊसतोडणी कामगारांना या पावसाचा फटका बसला. शहराच्या विविध सखल भागात पाणी साचून राहिले होते.
दरम्यान, काल व परवाही पावसाने दुष्काळी खटाव तालुक्याबरोबरच पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागाला चांगलेच झोडपून काढताना, घरांचे, शाळांचे पत्रे उडून जाणे, झाडे उन्मळून पडणे, वाहतूक ठप्प होणे असे प्रकार घडले होते. या पावसाने दुष्काळी खटाव तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे. तर, ढेबेवाडी विभागात बळीराजाने डोक्याला हात लावल्याने हा पाऊस कहीं खुशी, कहीं गम असाच म्हणावा लागेल.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा