केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचा परभणीच्या राजकीय वर्तुळास जबर धक्का बसला. मुंडे यांच्या रुपाने मराठवाडय़ाचे नेतृत्व हरवल्याची भावना जिल्ह्यातील नेत्यांनी व्यक्त केली.
खासदार संजय जाधव – मुंडे यांच्या निधनाने मराठवाडय़ातच शोककळा पसरली. नाथ्रासारख्या छोटय़ा गावातून संघर्षांच्या जोरावर राष्ट्रीय नेतृत्वापर्यंतचा थक्क करणारा प्रवास मुंडे यांनी करुन दाखवला. केवळ बीडचे नाही, तर संपूर्ण मराठवाडय़ाचे नुकसान त्यांच्या निधनामुळे झाले आहे. घरातील वडीलधारे माणूस गेल्यानंतर निर्माण होते तशी या निधनाने पोरकेपणाची भावना झाली.
आमदार रामप्रसाद बोर्डीकर – मुंडे आपल्यासाठी थोरल्या भावासारखे होते. १९८५-१९८६पासून त्यांच्याशी संबंध होते व ते त्यांनी जोपासले. त्यांच्या रुपाने मराठवाडय़ाचा आवाज कार्यरत होता. आज हक्काने मराठवाडय़ाच्या प्रश्नाबद्दल सांगावे, असे कोणी उरले नाही. आमचे पक्ष वेगळे होते; पण व्यक्तीश माझ्याविषयी त्यांना आस्था होती. मला ते कायम मोठय़ा भावासारखे वाटले. विकास प्रश्नांविषयी तळमळ असलेला नेता आपण गमावला. मुंडे विरोधी पक्षनेता झाले, तेव्हा परभणीत त्यांचा सत्कार माझ्याच पुढाकाराने झाला होता. खंबीर नेत्याला आपण मुकलो आहोत.
महापौर प्रताप देशमुख – मुंडे यांचे नेतृत्व ही मराठवाडय़ाची शान होती. शरद पवारांनंतर मुंडे हेच लोकनेते होते. तळागाळातल्या माणसांविषयी त्यांना आस्था होती. केंद्रीय स्तरावर काम करण्याची संधी त्यांना आता मंत्रिपदाच्या रुपाने मिळाली. मात्र, अकाली या नेतृत्वाचा अस्त झाला, हे मराठवाडय़ाचे दुर्दैव आहे. विकासाच्या प्रश्नावर पक्षीय मतभेद न ठेवता सर्वाना सहकार्य करण्याची त्यांची भूमिका सदैव होती. त्यांच्या जाण्याने मराठवाडय़ाची अपरिमीत हानी झाली.
गणेश दुधगावकर (माजी खासदार) – मुंडे हे मराठवाडा विकास आंदोलनातील आमचे सहकारी होते. त्यांचा बहुतांश राजकीय काळ विरोधी पक्षात गेला. विरोधी भूमिका घेऊन जनतेच्या प्रश्नावर त्यांनी लढे उभारले. त्यामुळेच ते सत्तेपर्यंत पोहचले. काळाने त्यांना हिरावून नेले, ही पोकळी कशानेही भरून निघणार नाही.
सुरेश देशमुख (काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष) – मुंडे दिलदार मनाचे होते. राजकीय मतभेद असूनही विकासाच्या प्रश्नावर त्यांनी कायम सर्वाना सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्यांच्या जाण्याने मराठवाडय़ाचे अपरिमीत नुकसान झाले. जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करताना मुंडे यांनी कायम सर्वसामान्यांची बाजू घेतली. आपला संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात, नाही तर प्रश्नांसाठी आहे एवढी प्रगल्भता त्यांनी आयुष्यभर जपली.
अॅड. विजय गव्हाणे (प्रदेश सरचिटणीस, भाजप) – मराठवाडा विकास आंदोलनापासून आम्ही सोबत होतो. मुंडे यांच्या नेतृत्वाला संघर्षांची पाश्र्वभूमी होती. हा संघर्ष त्यांनी मराठवाडय़ाच्या न्याय्य हक्कासाठी केला. भारतीय जनता पक्षाचा सामाजिक पाया विस्तारण्याचे भरीव कार्य मुंडे यांनी केले. सुरूवातीपासूनच या नेतृत्वाला संघर्षांची पाश्र्वभूमी आहे. हा संघर्ष मराठवाडय़ाचे मागासलेपण दूर करण्यासाठी होता. मुंडे यांच्या पश्चात मराठवाडय़ात पुन्हा संघर्षांच्या चळवळी उभ्या करणे हे मोठे आव्हान आहे.  
हेमराज जैन (ज्येष्ठ पत्रकार) – मुंडे यांचे अपघाती निधन हा मराठवाडय़ाला मोठा धक्का आहे. आता मराठवाडय़ाच्या प्रश्नावर लढण्यासाठी कोणीही वाली उरला नाही. विलासराव देशमुखांनंतर मराठवाडय़ाला बसलेला हा मोठा धक्का आहे.
अॅड. प्रताप बांगर (माजी अध्यक्ष, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ) – मुंडे हे मराठवाडय़ाचे पालक होते. त्यांच्या जाण्याने मराठवाडय़ाला कित्येक वर्षे मागे नेले आहे. मराठवाडय़ाच्या प्रश्नावर लढताना त्यांचा आवाज कायम चढाच होता. ज्यांच्याशी राजकीय मतभेद होते त्यांच्याशी त्यांनी कायम वैचारिक संघर्ष केला; पण कधीही कोणाशी वैयक्तिक वैर केले नाही. मराठवाडय़ाने त्यांच्यासारखा खंबीर पाठीराखा गमावला आहे.

Story img Loader