सोलापूर : केवळ व्यक्तिद्वेषातून सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी बेकायदा ठरवून जाणीवपूर्वक पाडण्यात आली असून त्यास भाजपचे स्थानिक आमदार-खासदार जबाबदार आहेत, असा थेट आरोप करीत, चिमणी पाडल्यामुळे कारखान्याचे सुमारे एक हजार कोटी रूपयांचे नुकसान झाल्याची भीती कारखान्याचे अध्वर्यू धर्मराज काडादी यांनी व्यक्त केली आहे.
३८ मेगावाट क्षमतेची सहवीज निर्मिती प्रकल्पाची चिमणी वाचविण्यासाठी अखेरच्या क्षणांपर्यंत प्रयत्न केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. परंतु हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात असल्यामुळे त्यावर स्थगिती देता येणार नाही. आपले हात बांधले गेले आहेत, असे स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांनी दिलासा देण्यास नकार दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता भेट झाली नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट झाली असता त्यांनी चिमणी वाचविण्यासाठी ज्यांना फोन करायचे होते, ते त्यांनी केले. परंतु उपयोग झाली नाही, अशा शब्दात काडादी यांनी हतबलता मांडली.
५० वर्षांचा जुना सिध्देश्वर साखर कारखाना राज्यात अग्रेसर असून २७ हजार सभासद शेतकरी आणि १२०० कामगारांची रोजीरोटी कारखान्यावर अवलंबून आहे. सहवीज निर्मितीमुळे सभासद शेतक-यांना चार पैसे जादा मिळत होते. परंतु चिमणी पाडल्यामुळे कारखाना पुढील दोन हंगामात तरी सुरू होणे अशक्य असल्याचे काडादी यांनी सांगितले. परंतु तरीही नव्या जोमाने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून कारखाना पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रामुख्याने भाजपचे आमदार विजय देशमुख यांना दोष दिला.
या प्रश्नावर आपण रस्त्यावरची आणि न्यायलयाची लढाई पुढे नेणार असून प्रसंगी राजकारणातही उतरण्याची तयारी असल्याचा मानसही त्यांनी बोलून दाखविला. कारखान्याच्या चिमणीमुळे विमानसेवेला अडथळा असल्याचा आरोप त्यांनी अमान्य केला. विमानसेवेला आपला विरोध नाही. परंतु मोठे औद्योगिक नुकसान करून विमानसेवेला अर्थ नाही. आमदारकीचा मोठा काळ मिळाला. मंत्रिपदही मिळाले. परंतु सत्तेच्या माध्यमातून सोलापुरात एक साधा उद्योग प्रकल्पही आणता आला नाही, अशा शब्दात काडादी यांनी आमदार विजय देशमुख यांच्यावर थेट नामोल्लेख टाळून टीकास्त्र सोडले.