दुष्काळ व पुरेशा उसाअभावी ४७ साखर कारखान्यांचे बॉयलर थंडावले असून पुढच्या वर्षीच्या हंगामात यातील बोटावर मोजण्याइतकेच कारखाने सुरू राहतील. त्यावर अवलंबून असणारे ऊसतोडणी कामगार, साखर कामगार, छोटे-मोठे उद्योजक यांची परिस्थिती अवघड होणार आहे. गाळपच कमी झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे तब्बल ६ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
चालू हंगामात साखरेला भाव नाही, कमी पर्जन्यमानामुळे उत्पादन नाही. शेतात उभ्या असलेल्या ुसाला पाणी नाही. त्यामुळे यंदाच्या ३ कोटी मेट्रिक टन उसाला फटका बसला असून त्यातून शेतकऱ्यांचे ६ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
साखर कारखान्यांचे प्रत्येकी १५ कोटी रुपये याप्रमाणे २ हजार ५२० कोटी रुपयांचे आर्थिक असंतुलन वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांची ऊस लावण्याची मानसिकता आता संपली आहे. उसाला बऱ्यापैकी भाव मिळत असताना निसर्गाने मात्र शेतकऱ्यांच्या तोंडातील घास काढून घेतला आहे. दुष्काळाने शेतकरी पुरता वैतागला आहे.
दुष्काळी परिस्थिती यापूर्वीही होती. त्या परिस्थितीत पाटपाण्याचे नियोजन तत्कालीन पाटबंधारे अधिकाऱ्यांनी चांगले करून सर्वाना दिलासा दिला. मात्र यंदाच्या हंगामात पाटबंधारे खात्याने बोगस आकडेवारी देऊन शेतकऱ्यांच्या पिकांनाच पाण्यावाचून वंचित ठेवले आहे. त्यामुळे त्यांचे नगदी पिकांसह फळबागांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ते कसे भरून काढणार हा प्रश्नच आहे.
राज्यातील विभागनिहाय गाळप व साखर उत्पादनाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. कारखान्यांची संख्या-केलेले गाळप-साखर उत्पादन-उतारा-बंद झालेल्या कारखान्यांची संख्या, याप्रमाणे ही आकडेवारी देण्यात आली आहे.
कोल्हापूर : ३५-१ कोटी ४८ लाख ६१ हजार-१८ लाख ३० हजार-१२.३१ टक्के-३, पुणे : ५४-२ कोटी ४२ लाख ४५ हजार-२६ लाख ७७ हजार-११.०४-१०, अहमदनगर : २५-९२ लाख ५६ हजार-१० लाख-१०.८०-९, औरंगाबाद : १८-४६ लाख ३ हजार-४ लाख ७२ हजार- १०.२५-१५, नांदेड : २९-८८ लाख ४ हजार-९ लाख ३१ हजार-१०.८२-१०, अमरावती : ३-५ लाख ८१ हजार-६० हजार-१०.२७ आणि नागपूर : ४-७ लाख ६१ हजार-७० हजार-९.२४ नगर जिल्हय़ातील २० कारखान्यांपैकी ४ कारखाने बंद असून राहुरी, श्रीगोंदे, वृद्धेश्वर, प्रसाद, गंगामाई या पाच कारखान्यांचे हंगाम बंद झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा