सोलापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीने भाजपच्या तुफानाला रोखताना आपल्या जागा कशाबशा राखल्या असताना अनेक ठिकाणी पक्षांतर्गत दगाबाजीचे प्रकार घडल्यामुळे नामुष्की पत्करावी लागली. सोलापूर शहर मध्यमध्ये पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वत: दिलेल्या उमेदवाराला तर फक्त ७७९ मते एवढीच मिळाली. स्थानिक धुरिणांनी पक्षाचे कामच केले नसल्याचे यावरून स्पष्ट होते.
आतापर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे सोलापूर शहरात राष्ट्रवादीला विधानसभा किंवा लोकसभेची जागा लढविता येत नव्हती. केवळ महापालिका निवडणुकीतच पक्षाचे घडय़ाळ चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचत असे. त्यामुळे पक्ष जिवंत राहण्यासाठी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा आग्रह पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडूनच होत होता. या पाश्र्वभूमीवर यंदा विधानसभा निवडणुकीत योगायोगाने आघाडी तुटली आणि राष्ट्रवादीने सोलापूर शहरात तिन्ही जागांवर उमेदवार उभे केले.
तथापि, पक्षांतर्गत वाद, लाथाळ्या आणि ‘अर्थ’पूर्ण मांडवली करून दुसऱ्या पक्षाच्या तगडय़ा उमेदवारापुढे शरण जाण्याची वृत्ती यामुळे राष्ट्रवादीला मोठी नामुष्की पत्करावी लागली. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील एकमात्र मोहोळ येथे राष्ट्रवादीचे रमेश कदम हे निवडून आले. उर्वरित सर्व पाच जागांवर दारूण निराशाच नव्हे तर मोठी मानहानी झाली. सोलापूर शहर उत्तरमध्ये महेश गादेकर यांनी भाजपचे विजय देशमुख यांच्याशी सामना करताना १७ हजार ९९९ मते घेतली. अर्थात, गादेकर हे दुसऱ्या क्रमांकावर असले तरी त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. द. सोलापुरात बाळासाहेब शेळके यांना १२ हजार ३६३ मिळाली. तर पंढरपुरात चंद्रकांत बागल यांना केवळ ३०७५ मते पडली. त्यापेक्षा दारूण स्थिती अक्कलकोटमध्ये दिलीप सिध्दे यांची होऊन त्यांना जेमतेम १५१६ मते मिळू शकली. त्यापेक्षा आणखी धक्का म्हणजे सोलापूर शहर मध्य मतदारसंघात विद्या लोलगे यांना फक्त ७७९ एवढी निचांकी मते मिळाली. आश्चर्य म्हणजे विद्या लोलगे यांची उमेदवारी शरद पवार यांनी स्वत: पसंत केली होती.
सोलापूर शहर मध्यमध्ये राष्ट्रवादीची शक्ती दुर्लक्षित असल्याचे म्हणता येणार नाही. पक्षाचे एकूण १६ नगरसेवकांपैकी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांच्यासह १२ नगरसेवक याच मतदारसंघात आहेत. यात पालिका गटनेते दिलीप कोल्हे, गेल्याच वर्षी पालिका स्थायी समितीचे सभापतिपद सांभाळलेले इब्राहीम कुरेशी, बिस्मिल्ला शिकलगार, गीता मामडय़ाल, सुनीता रोटे, किशोर माडे, पीरअहमद शेख, नीला खांडेकर, स्वीकृत दीपक राजगे यांचा समावेश आहे. तसेच माजी आमदार युन्नूसभाई शेख, प्रांतिक नेते कय्युम बुऱ्हाण, शफी इनामदार ही मंडळी याच शहर मध्य मतदारसंघात आहेत. ही सर्व जमेची असूनही विधानसभेसाठी पक्षाकडून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात उभे राहण्यासाठी कोणीही तयार नव्हते. ‘सारा गाव मामाचा-एक नाही कामाचा’ असा कटू अनुभव लोलगे यांना घ्यावा लागला.
यासंदर्भात बोलताना लोलगे यांनी आपणास २५ हजारांपर्यंत मते मिळणे अपेक्षित होते, केवळ ७७९ मते मिळाली ही कुचेष्टा असल्याचे नमूद केले. कय्युम बुऱ्हाण यांच्यासारख्या स्थानिक नेत्याच्या मौलाना आझाद तंत्रनिकेतन संस्थेला शरद पवार यांनी ७५ लाखांची मदत केली होती. निदान त्याची तरी जाणीव त्यांनी ठेवायला हवी होती. यासंदर्भात शरद पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर पवार हे गंभीर दखल घेणार की सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रेमापोटी त्याकडे डोळेझाक करणार, याची चर्चा राष्ट्रवादीत होत आहे.

Story img Loader