राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय बलस्थान असलेले ५ साखर कारखाने सलग २ वर्षांपासून बंद, तर एक कारखाना अवसायानात काढून खासगी कंपनीच्या ताब्यात दिला आहे. या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊसउत्पादकांना भाजपच्या नेतृत्वाखालील कारखान्यांनी तारले असले, तरी कामगारांना मात्र आर्थिक खाईत लोटले आहे. राजकीय प्रभावासाठी उभारून बंद पडलेल्या कारखानदारीने ग्रामीण अर्थकारणाची घडीच विस्कटली. त्यामुळे निवडणुकीत राष्ट्रवादीला याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होते.
राज्याला ऊसतोडणी मजूर पुरवणारा जिल्हा अशी बीडची ओळख आहे. सर्वच पक्षांचे नेते भाषणात मजुरांना ऊस बागायतदार करण्याच्या घोषणा करतात. प्रत्यक्षात मात्र उभारलेली साखर कारखानदारी मोडकळीस आणण्यास या नेत्यांचा कारभारच कारणीभूत असतो, हे उघड गुपित आहे. जिल्ह्य़ात ७ सहकारी व २ खासगी साखर कारखाने उभारण्यात आले. त्यामुळे उसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ होऊन २ वर्षांपूर्वी ५० हजार हेक्टपर्यंत लागवड झाली. ग्रामीण अर्थकारण व राजकारण मुख्यत्वे कारखान्यांभोवती फिरते. त्यामुळे कारखानदारांनी वर्चस्व निर्माण केले खरे. परंतु कारखानदारी उभारताना पाण्याचे कोणतेही नियोजन न केल्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडताच ऊसटंचाई, सोबतीला बेजबाबदार कारभार यामुळे कारखानदारी अडचणीत आली. परिणामी कारखाना सुरूकरण्यापेक्षा बंद ठेवणेच कारखान्यांसाठी फायद्याचे झाले.
राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश धस यांच्या आष्टीतील कडा सहकारी साखर कारखाना अवसायानात काढून खासगी कंपनीच्या घशात घातला. हा कारखाना २ वर्षांपासून बंद आहे. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील गजानन सहकारी साखर कारखानाही बंद आहे. राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आमदार अमरसिंह पंडित यांच्या गेवराईतील जय भवानी सहकारी कारखान्याचे गाळप बंद आहे. या कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी पगारासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले. लोकसभेचे मागील वेळचे राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश आडसकर यांच्या ताब्यात असलेला अंबाजोगाई सहकारी साखर कारखानाही बंद आहे. केज तालुक्यातील काँग्रेसचे माजी मंत्री अशोक पाटील व राज्यसभा खासदार रजनी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पद्मश्री विखे कारखाना बंद आहे. या तालुक्यात राष्ट्रवादीचे जि. प. सदस्य बजरंग सोनवणे यांचा येडेश्वरी हा खासगी कारखाना सुरू असल्याने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला, तर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचा माजलगाव सहकारी साखर कारखाना हा एकमेव पूर्ण क्षमतेने चालू राहिला. त्यामुळे आसपासच्या तालुक्यांतील ऊस गाळपाला आधार मिळाला. परिणामी या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस भाजप खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी कारखान्याने मोठया प्रमाणात गाळप करून उत्पादकांना दिलासा दिला.
केज, अंबाजोगाई, धारुर, वडवणी परिसरातील ऊस ‘वैद्यनाथ’ने उचलला, तर मुंडेंच्याच पणगेश्वर, योगेश्वरी, शंभु महादेव या खासगी कारखान्यांनी मोठय़ा प्रमाणात ऊस गाळप करून शेतकऱ्यांना हात दिला. ‘वैद्यनाथ’ने चालवायला घेतलेल्या पाथर्डीतील केदारेश्वर कारखान्याने मागील वर्षी गाळप केले, तर मुंडेंच्या शिफारशीवरून नॅचरल शुगर या कारखान्यानेही ऊस गाळपासाठी नेला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर पडता आले.
मात्र, कारखाने बंद पडल्यामुळे ऊस लागवड व इतर उद्योगधंद्यांवरही परिणाम झाला. कामगार, कारखान्याच्या व्यवहारावर अवलंबून इतर व्यावसायिकही अडचणीत सापडले. कारखानदारी बंद पडल्याने ग्रामीण अर्थकारण विस्कटले गेले. पश्चिम महाराष्ट्रातील नेतृत्व साखर कारखानदारीसह इतर उद्योग चालवून राजकीय वर्चस्व टिकवून ठेवते. मात्र, जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीच्याच दिग्गजांनी ही दृष्टी दाखवलीच नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा