सदोष निवड प्रक्रियेमुळे नोकऱ्या गमवाव्या लागलेल्या कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी पदोन्नत होऊन बाजी मारली आहे. एक दोन नव्हे, तर आधीच्या सेवेतील (२००५) तब्बल ५१ कनिष्ठ संशोधक सहाय्यक(जेआरए) नव्याने राबवण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत वरिष्ठ संशोधक सहाय्यक (एसआरए) म्हणून निवडून आले. त्यामुळे गेल्या १० वर्षांपासून विद्यापीठाची रखडलेली निवड प्रक्रिया प्रवाहित झाल्याचा आनंद विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आदींनी व्यक्त केला आहे.
अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. शरद निंबाळकर कुलगुरू असताना नियुक्तयांमध्ये मोठय़ा प्रमाणात अनियमितता झाल्याचा आक्षेप घेत माजी कुलगुरू डॉ. बळवंत बथकल न्यायालयात गेले होते. त्यावेळी १३१ जेआरए आणि एसआरए यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. न्यायालयीन प्रक्रिया, न्या. धाबे आयोगाने साडेतीन वर्षे केलेला तपास, विद्यापीठ प्रशासनाने केलेला वेळकाढूपणा, उच्च व सर्वोच्च न्यायालय यात नोकऱ्या गमावणाऱ्यांचे सात-आठ वर्षे वाया गेले. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. सर्वोच्च न्यायालयाने सदोष निवड प्रक्रियेवर ताशेरे ओढले असले तरी उमेदवारांविषयी न्यायालयाने सहानुभूती दर्शवून त्यांना पुन्हा निवड प्रक्रि येला सामोरे जाण्याची संधी दिली. त्यामुळेच विद्यापीठाने नव्याने जाहिरात देऊन आधी सेवेत असलेल्यांनाही अर्ज करण्याची संधी दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार विद्यापीठाने निवड प्रक्रिया राबवणे मनावर घेतले आणि वरिष्ठ संशोधक सहाय्यकाच्या ७१ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. त्यासाठी विद्यापीठाला ९०० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी जवळपास २७५उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. त्यातून ६५ जागा विद्यापीठाने भरल्या असून उर्वरित सहा जागांवरील निवड प्रक्रिया मराठा आरक्षणाच्या संदिग्धतेमुळे लांबणीवर पडली आहे. आश्चर्य म्हणजे, १० वषार्ंपूर्वीच्या वादग्रस्त ठरलेल्या सदोष निवड प्रक्रियेमुळे अनेक चांगल्या सहाय्यक प्राध्यापकांचे बळी गेले होते. मात्र, पात्रतेच्या अटींची पूर्तता करून ते पुन्हा विद्यापीठ सेवेत रुजू झाले. त्यापैकी बरेच उमेदवार आधीच्या सेवेत जेआरए होते ते आता एसआरए म्हणून पदोन्नत होऊन विद्यापीठाच्या वेगवेगळ्या केंद्रांवर रुजूही झाले आहेत. एप्रिलच्या शेवटी जेआरएच्या ७४ जागांसाठी मराठा आरक्षणातील जागा सोडल्यास बाकी जागांसाठी निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. या ७४ जागांसाठी तब्बल २ हजार अर्ज विद्यापीठाला प्राप्त झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा