गिरणी कामगार व वारसांना मुंबईत रिक्षा-टॅक्सीचे परवाने द्या, तसेच मिलच्या जागेवर उभारण्यात आलेल्या प्रकल्पात वारसांना नोकरीत सामावून घ्या, अशी मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने केली असल्याची माहिती संघटनेचे राज्य सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी गिरणी कामगार मेळाव्यात बोलताना दिली.
सिंधुदुर्ग, राजापूर व रत्नागिरी येथील गिरणी कामगारांचा मेळावा राजापूर येथे आयोजित करण्यात आला होता तेव्हा मोहिते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी आमदार गणपत कदम, माजी आमदार सुभाष बने, संघटना राज्य उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, खजिनदार निवृत्ती देसाई, सेक्रेटरी सुनील बोरकर, सिंधुदुर्ग अध्यक्ष दिनकर मसगे, रत्नागिरी अध्यक्ष रमेश कानडे, सुभाष शिंदे, प्रकाश कदम आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ गिरणी सुरू झाल्यापासून अस्तित्वात आहे. गिरणी कामगार व वारसांना न्याय मिळावा म्हणून न्यायालय व सरकार पातळीवर भांडत आहे. या संघटनेचे अध्यक्ष राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर संघटनेच्या माध्यमातून कामगारांना अनेक पायाभूत सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत, असे राज्य सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले.
गिरणी कामगारांच्या प्रश्नावर सातत्याने सचिनभाऊंनी आवाज उठवून न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या वारसांनाही शैक्षणिक सुविधा मिळवून दिल्या आहेत. गिरणी कामगारांना सरसकट बीपीएल रेशनकार्ड मिळावे, अशी आमची मागणी आहे. कामगारांना लॉटरीत घरे लागली आहेत ती विकू नका. ती दहा वर्षे विकताही येणार नाहीत, पण भाडय़ाने देता येतील, असे गोविंदराव मोहिते म्हणाले.
गिरणी कामगार व वारसांना गिरणीच्या जागेवर उभारण्यात आलेल्या प्रकल्पांत नोकऱ्या द्या, रिक्षा-टॅक्सी परवाने द्या, अशा विविध मागण्या करण्यात आल्याचे मोहिते यांनी सांगितले. मी गिरणी कामगार होतो. नंतर मुंबई नगरसेवक व तीन वेळा आमदार झालो आहे. आता गिरणी कामगारांच्या लढाईत मी असेन. वेळप्रसंगी सरकारविरोधी लढा द्यायची तयारी ठेवा, असे माजी आमदार गणपत कदम यांनी सांगितले. गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळावीत ही मागणी रास्त आहे. उद्या गावाकडे घरे देत असतील तर घरांचा आकार वाढवून मागा, असे आवाहन माजी आमदार सुभाष बने यांनी केले. उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर यांनी गिरणी कामगारांचा हक्क मिळवून देण्यासाठी आमचा लढा शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहील, असे म्हणाले. गिरणी कामगार व वारसांना घरे मिळविण्यासाठी संघटना झगडतेय, पण कामगारांची एकजूटच प्रश्न सुटण्यासाठी मदत करणारी आहे, असे खजिनदार निवृत्ती देसाई म्हणाले. सिंधुदुर्ग अध्यक्ष दिनकर मसगे, रमेश कानडे, प्रकाश कदम यांनी विचार मांडले. सिंधुदुर्गात राजश्री सावंत, विष्णू परब, शाम कुंभार, सुभाष परब, राणे, लॉरेन्स डिसोझा, तसेच असंख्य कामगार उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा