कोमल प्रेमाचे विणलेले धागे एका क्षणात तुटतात तेव्हा प्रेमाचा बेरंग होतो, पण त्यातूनही इतरांनी ठेच घ्यायची असते, पण शालेय महाविद्यालयीन विद्यार्थिनी प्रेमाच्या या भंगलेल्या बलात्कारित चेहऱ्याला फसतात. त्याचमुळे शालेय विद्यार्थिनी, विवाहिता आत्महत्येस प्रवृत्त होत असल्याचे बोलले जात आहे.
निरवडे येथे दोन जिवानी प्रेम केले. त्यांनी लग्न करण्याचे ठरविले, पण प्रेमाच्या त्रिकोणाच्या संशयाचे भूत तरुणाच्या डोक्यात भिनले. त्याने तिच्याकडे पाच हजार रुपये मागितले. तिने नकार देताच अंगावर रॉकेल ओतण्याचा प्रसंग घडला. या अपघातातून प्रेमाचा बेरंग झाला आणि उपचारानंतर दोघांनाही मृत्यूने कवटाळले.
माजगाव येथील प्रीतेश आवाडे याने प्रेमातून लग्न केले. स्वत:चा व्यवसाय सुरू केला पण रक्षाबंधनदिवशी नातेवाईक महिलेस मोटरसायकलवरून नेताना त्याचे विचार फिरले. त्याने चक्क वयोवृद्ध महिलेच्या डोक्यावर जड वस्तू मारून गळ्यातील दागिने पळविले. पोलीस घरी आले, प्रीतेशला घेऊन गेले. त्याने चोरी केल्याचे पत्नी शीतल आवाडे हिला कळले. या चोरीच्या बदनामीने तिने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली.
या दोन प्रेमानी बेरंग केला. तिसऱ्या एका प्रकरणात बीसीए महाविद्यालयात शिक्षण घेणारी तृप्ती गावकर वसतिगृहातून गेली. ती बेपत्ता झाली. या ठिकाणीही प्रियकराने कानाखाली मारल्याने तिने आत्महत्या केल्याचे उघड झाले. तिचा मृतदेह मिळाला पण तो भावाने ओळखला नाही. ती जिवंत असल्याचे सांगितले. मुंबईत पोलीस पथक पोहचले, पण ती सापडली नाही, हेही प्रेमाचे स्वप्न अधुरेच राहिले.
या तीन प्रकरणांतून प्रेमाचा बेरंग झाल्याचे उघड झाल्याचे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बोध घेऊन कोमल मनावरून प्रेमाचे रंग उधळणे बंद करावेत असे बोलले जाते.