सांगली : मुस्लिम समाजाला कठोर विरोध करण्याच्या भूमिकेशी मी सहमत नसून, लव्ह जिहाद विरोधी कायदा बनवताना मुलीला मुस्लिम बनवण्याचा प्रयत्न करू नये अशी कायद्यात तरतूद करावी अशी आपली भूमिका असल्याचे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी सांगलीत सांगितले.

सांगलीच्या विश्रामधामवर आज मंत्री आठवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मुस्लिम हे येथीलच, आपल्याच देशातील आहेत. ते काही पाकिस्तानातून आलेले नाहीत. मुलगा आणि मुलगी जर लग्न करत असतील तर त्याला विरोध होऊ नये, पण मुलीला मुस्लिम बनवण्याचा प्रयत्न होऊ नये. पण भाईचारा मजबूत करायचा असेल तर इतकी कठोर भूमिका घेणे योग्य नाही.

जर अशी लग्ने होत असतील तर त्याला लव्ह जिहाद म्हणून विरोध करू नये असे माझे मत आहे. तसेच भोर येथील विक्रम गायकवाड यांच्या हत्येच्या घटनेविषयी बोलताना ते म्हणाले की, या हत्या प्रकरणी केवळ एक आरोपी पकडला आहे. या घटनेत ८-१० आरोपी असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही भेटून हे सांगणार आहोत. आपले सरकार असतानाही दलितांना असुरक्षित वाटत आहे. दलितांनी भरभरून महायुतीला मतदान केले आहे. तरीही त्यांची अशी अवस्था असेल तर ते योग्य नाही.

राज्यघटना, संविधान बदलणे कोणाला शक्य नाही, जर एखाद्या कायद्यात दुरुस्ती करायची असेल तर तो अधिकार बाबासाहेबानी संसदेला आधीच दिलेला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर जे म्हणतात की सरकार संविधान बदलणार आहे या मताशी मी सहमत नाही. नॉन क्रिमिलेयरचे उत्पन्न ८ लाख मर्यादेवरून बारा लाखापर्यंत वाढवावे, अशी मागणी होत आहे. ती मंजूर करण्यासाठी मी प्रयत्न करेन. असेही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची भूमिका नाही. या निवडणुका महायुतीने एकत्र लढावाव्यात असे माझे मत आहे. येत्या सप्टेंबर, ऑयटोबरमध्ये होतील तेव्हा रिपाइंला यामध्ये जागा मिळाल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.

Story img Loader