कराड : लव्ह जिहाद, गोहत्या आणि धर्मांतराविरोधात तसेच समान नागरी कायद्याच्या मागणीसाठी देशातील बहुसंख्य लोक आक्रमकपणे आंदोलन करत आहेत. मोर्चे काढत आहेत. तरी जनभावना आणि न्याय मागण्यांचा आदर करून, लव्ह जिहाद, गोहत्या आणि धर्मांतराविरोधातील कायदा करण्याबरोबरच समान नागरी कायद्याची मागणीही सरकारने पूर्ण करावी असे आवाहन तेलंगणाचे आमदार राजाभैय्या यांनी केली.
कराडचे प्रवेशद्वार असलेल्या पांढरीच्या मारुती मंदिरापासून आमदार राजाभैय्या, भाजपनेते डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, एकनाथ बागडी यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या मुख्य मार्गावरून हिंदू गर्जना मोर्चा निघाला होता. मोर्चाच्या अग्रभागी भगव्या टोप्या घातलेल्या युवती व महिला हातात ध्वज व आपल्या मागण्यांचे फलक घेवून सहभागी झाले होते. मोर्चात बहुतेक हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्याने या आंदोलनाला भव्य स्वरूप आले होते. मोर्चेकऱ्यांनी हिंदू विरोधी प्रवृत्तीच्या विरोधात घोषणा दिल्याने सारा परिसर दणाणून गेला होता.
प्रसारमाध्यम व मोर्चेकऱ्यांसमोर बोलताना राजाभैय्या म्हणाले की, हिंदू हृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तरुणांनी जोपासण्याची आवश्यकता असताना बाळासाहेबांच्या जन्मदिनी आज हजारो तरुण हिंदुत्वाचा विचार घेऊन या आंदोलनात सहभागी झालेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे हिंदू तरुण केवळ मंदिरात घंटा वाजवणारा नव्हेतर देशद्रोह्यांना ठोकणाराही असला पाहिजे. लव्ह जिहाद, गोहत्या आणि धर्मांतर रोखण्याची आज आवश्यकता असून, तरुणांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेनुसार अखंड हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी कटिबध्द राहिले पाहिजे असे आवाहन राजाभैय्या यांनी केले.
लव्ह जिहाद, गोहत्या आणि धर्मांतर या गंभीर प्रश्नांवर प्रचंड मोठी आंदोलने सुरु असल्याने आमच्या मागणीनुसार हे तीनही गैरकृत्ये रोखण्यासाठी कठोर कायदा व्हावा अशी मागणी राजाभैय्या यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांना छळणाऱ्या आणि छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे करून त्यांना मारणाऱ्या औरंगजेबाला एमआयएमचे आमदार अथवा अन्य कोणी दयाळू म्हणत असतीलतर अशा प्रवृत्तींना झोडपून हाकलून दिले पाहिजे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह जे पक्ष हिंदूविरोधी आहेत. त्यांच्याबाबत हिंदू जनतेने गांभीर्याने विचार करण्याची नितांत गरज असल्याचे आवाहनही राजाभैय्या यांनी या वेळी केले.