अति उत्कट सर्वस्व एखाद्याला बहाल करणे, समर्पण करणे म्हणजे प्रेमच. प्रेम म्हणजे सहज भावना आहे असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांनी काढले. पाक्षिक सिंधुरत्नच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रेमपत्र लेखन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी गझलकार अप्पर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, कोमसापचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख एल. बी. पाटील, कोमसापचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शशिकांत तिरोडकर, रायगड जिल्हा अध्यक्षा सुनंदा देशमुख, सिंधुरत्नचे संपादक प्रकाश सोनवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रेमपत्र लेखन स्पर्धेत पुरुष गटात विलास खंडेराव समेळ, घणसोली यांना प्रथम, के. पी. पाटील, चेंढरे-अलिबाग द्वितीय, मिलिंद कल्याणकर तृतीय, नेरुळ उत्तेजनार्थ कैलास मारुती पिंगळे, अलिबाग, वैभव बाबल खानोलकर, सिंधुदुर्ग यांना गौरविण्यात आले. तर महिला गटात रेखा हिरामण चव्हाण, पेण यांना प्रथम, तर ज्योती शंकरराव जाधव, कोपरखैरणे यांना द्वितीय तर श्रीमती आशा राईरकर, अलिबाग व विजया सीताराम चाफेकर, अलिबाग यांना तृतीय क्रमांक विभागून त्याचप्रमाणे अदिती उपेंद्र मराठे, ममता विजय मेहता, महाड, रुपाली राजेंद्र कदम, अलिबाग यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरविण्यात आले. या वेळी वक्त्यांच्या बहारदार आणि प्रेमाच्या शेरोशायरीमुळे संपूर्ण वातावरण गुलाबी झाले होते. डॉ. महेश केळुसकर यांनी प्रेमाविषयीची व्याख्या आपल्या शैलीत सादर केली. प्रेम करण्यावर बंधन नसल्याचेही ते म्हणाले. शेवटी त्यांनी आपली सुप्रसिद्ध झिणझिणाट ही मालवणी कविता पेश केली त्यावेळी सभागृहात हास्याची लहर उमटली. सर्वानाच प्रेम आपल्या घरामध्ये नको हवे असते, मात्र दुसऱ्याच्या प्रेमामध्ये सगळ्यांनाच रस असतो. प्रेमपत्र लिहिणं ही अवघड गोष्ट आहे असे सुप्रसिद्ध गझलकार अपर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे म्हणाले. या वेळी त्यांनी शायर मोमीन आणि मिर्झा गालीब यांच्या प्रेमावरील गझल सादर केल्या. एल. बी. पाटील यांनी आपली आगरी भाषेतील ‘सारे बाराचा पलाट’ ही कविता सादर केली. सुनंदा देशमुख यांनी प्रेम ही कधीही न संपणारी गोष्ट असून, या स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादावरून पत्राची किमया व्यक्त करण्याची ऊर्मी दिसल्याचे सांगितले. शशिकांत तिरोडकर यांनी कवितेतून प्रेमपत्र सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता पाटील यांनी केले.
प्रेम म्हणजे सहज भावना -डॉ. महेश केळुसकर
अति उत्कट सर्वस्व एखाद्याला बहाल करणे, समर्पण करणे म्हणजे प्रेमच. प्रेम म्हणजे सहज भावना आहे असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांनी काढले.
First published on: 04-12-2012 at 05:23 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love mean natural feeling