नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यातील वडगाव येथे एका प्रेमीयुगुलाच्या लग्नाला दोघांच्याही घरच्यांनी विरोध केला. त्यामुळे या प्रेमीयुगलाने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे हदगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी (३ जानेवारी) सकाळी उघडकीस आली. तामशाजवळील वडगाव शिवारात सोमवारी पहाटे ही घटना घडल्याचं समोर आलं. प्रेमीयुगलाने मोबाईलवर स्वत:च्याच श्रद्धांजलीचे स्टेट्स ठेवल्यामुळे या घटनेचा सुगावा लागला.
तामसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव शेषेकांत रामराव पाटील (वय २४) आणि तरुणीचे नाव शिवानी केशव हरण (वय २२) असे आहे. दोघांनी वडगाव शिवारात विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार प्रेमी युगुल हे एकाच गावातील आणि एकाच समाजातील होते. विवाहाला घरचे मान्यता देणार नाहीत या भीतीपोटी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा वडगाव परिसरात आहे.
मित्रांनी श्रद्धांजलीचं स्टेट्स पाहिल्यावर कुटुंबाला सांगितलं
दरम्यान, सोमवारी सकाळी त्यांच्या मित्रांनी दोघांच्या मोबाईलवर ठेवलेले स्टेट्स बघून त्यांना फोन केले. परंतु, फोनचे उत्तर मिळत नव्हते. त्यामुळे मित्रांनी प्रेमीयुगलाच्या घरच्यांना याबाबत कळवले. यानंतर ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. दोघांच्या पार्थीव देहावर सोमवारी दुपारी ३ वाजता तामसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा : हिंगोलीत एकाच झाडाला गळफास घेऊन पती-पत्नीची आत्महत्या
या प्रकरणी तामसा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाचा अधिक तपास साहायक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे करत आहेत.