सोलापूर : आपल्या प्रेयसीचा जाळून खून केल्याबद्दल प्रियकराला माळशिरसच्या सत्र न्यायालयाने दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. उमेश धुमाळ (रा. अकलूज) असे आरोपीचे नाव आहे.

या खटल्याची पाश्र्वभूमी अशी, की मृत जबिना शेख ही विवाहित होती. ती आपला पती फिरोज शेख याजबरोबर अकलूज येथे एकत्र राहात होती. पती फिरोज याचा मित्र उमेश धुमाळ याचे त्याच्या घरी येणे-जाणे होते. त्यातूनच त्याची जबिना हिच्याशी जवळीक निर्माण झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होऊन त्याची वाच्यता होऊ लागली. तेव्हा एकेदिवशी उमेश याने मित्र फिरोज  यास न विचारता जबिना हिला तिच्या माहेरी माजलगाव येथे नेऊन सोडले होते. ही बाब फिरोज याने जबिना हिच्या आई-वडिलांच्या कानावर घातली. तेव्हा जबिना हिच्या आईने ही चूक मान्य करून यापुढे जबिना ही जबाबदारीने व चांगल्या प्रकारे वागेल, अशी हमी दिली. त्यानुसार फिरोज याने जबिना हिला अकलूजमध्ये स्वत:च्या घरात आणले होते. परंतु पुढे काही दिवसांनी जबिना व तिचा प्रियकर उमेश यांच्यातील प्रेमसंबंध पुन्हा सुरू झाले. त्यामुळे वैतागलेल्या फिरोज याने शेवटी जबिना हिला तलाक दिला होता. नंतर जबिना ही मोकळी होऊन प्रियकर उमेश याजबरोबर एकत्र राहू लागली. तिच्यासोबत मुलगा सुफियान हादेखील राहात असे.

घटनेपूर्वी उमेश व जबिना यांच्यात आठ दिवसांपासून भांडण सुरू झाले होते. ११ सप्टेंबर २०१६ रोजी अकलूज येथे ६५ बंगला परिसरातील घरी उमेश आला असता जबिना हिने घराचा बंद दरवाजा उघडला नव्हता. तेव्हा बळाचा वापर करून उमेशने दरवाजा उघडला आणि तिला मारहाण केली. त्या वेळी रागाच्या भरात उमेशने जबिना हिच्या अंगावर रॉकेल ओतले. तेव्हा तिने त्रास न देण्याबद्दल व मारू नका म्हणून विनवणी केली. परंतु निर्दयी उमेशने तिला पेटवून दिले. पेटलेल्या अवस्थेत जबिना हिने उमेश याच्याशी झटापट  करण्याचा प्रयत्न केला. त्यात उमेश हा किरकोळ भाजून जखमी झाला. जबिना हिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना अखेर तिचा मृत्यू झाला. तिने मृत्युपूर्व जबाब दिला होता.

याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात उमेश धुमाळ याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यास अटक झाली होती. तपासानंतर पोलिसांनी त्याच्याविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी माळशिरसचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. आर.पठारे यांच्यासमोर झाली. सरकारतर्फे सुरूवातीला तत्कालीन जिल्हा सरकारी वकील संतोष न्हावकर व नंतर सहायक सरकारी वकील संग्राम पाटील यांनी १४ साक्षीदार तपासले. यात पुरावे व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य़ धरून न्यायालयाने आरोपी उमेश धुमाळ यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Story img Loader